By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशाच्या गौरवशाली इतिहासामध्ये अनेकांचं महत्त्वाचं योगदान आहे. असंच अतीशय महत्त्वपूर्ण योगदान आहे, भारतीय सुरक्षा दलांचं. देशाचं रक्षण करण्याच्या हेतूने तत्पर असणाऱ्या सुरक्षा दलांपैकी एक असणाऱ्या भारतीय नौदलासाठी ४ डिसेंबर या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे.
४ डिसेंबर, या दिवशी आज नौदल दिन साजरा करण्यात येत आहे. भारतीय सागरी सीमांचं रक्षण करणाऱ्या नौदलाचा हा विजय दिवस. दरवर्षी एखादी थीम घेऊन हा दिन उत्सहात साजरा केला जातो. यावर्षीही 'सुरक्षित समुद्र, मजबूत किनारा' य़ा थीमसह नौदल दिन साजरा होतोय. १९७१ साली पाकिस्तानविरूद्ध युद्धात भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडण्टमध्ये पाकिस्तानची युद्धनौका पीएनएस खलिबारला बुडवलं. त्या प्रित्यर्थ हा दिन साजरा केला जातो. साधारण, गेल्या आठवडाभर नौदलातर्फे विविध ठिकाणी प्रात्यक्षिकं सादर होत आहेत.
जवळपास ७ हजार ५१६ किमी सागरी सीमा भारताला लाभली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेच्या बाबतीत सांगावं तर, ही जवळपास ५० टक्के सागरी सीमा आहे. ही सागरी सीमा भारतातील ९ राज्य आणि ४ केंद्रशासित प्रदेशांना जोडते. त्याच्याच संरक्षणार्थ नौदल सतत तत्पर असतं.
खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाची सुरुवात झाली इस्ट इंडिया कंपनीच्या काळात. जेव्हा इस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या जहाजांचा ताफा गुजरातच्या सूरत या बंदरावर पोहोचला होता. त्यावेळच्या नौदलाचं नाव होतं, East India Company Marine. पुढे, हे नाव बदलून रॉयल इंडियन मरिन असं करण्यात आलं. १९३४मध्ये हे दल, रॉयल इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जाऊ लागलं. २६ जानेवारी १९५०ला या नावातून रॉयल हा शब्द हटवत Indian Navy इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदल म्हणून या दलाची ओळख सर्वांसमक्ष आली.
जगातील अनेक देशांची नौदलं पाहता भारतीय नौदलही त्यांच्या तोड़ीस तोड आहे. अद्ययावत तंत्रज्ञान, पाणबुड्या, लढाऊ विमानं आणि मोठ्या शौर्याने देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असणारे, नौदलाच्या सेवेत रुजू असणारे सर्वच जवान/ अधिकारी यांच्यासह भारतीय नौदल देशाच्या संरक्षणात महत्त्वाच्या भूमिकेत होतं, आहे आणि यापुढेही राहील.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रखडण्याची चिन्ह असताना देशात आणखी चार नव्या मार....
अधिक वाचा