By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 26, 2020 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषीविधेयकांना राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या सुरात आता राज्य सरकारनंही सूर मिसळला आहे. केंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागूच होऊ देणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषिविधेयकांविरोधात महाराष्ट्रातही संताप आहे. याच संतापाचा उद्रेक आज महाराष्ट्रात पाहायला मिळाला. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधेयकाच्या प्रती जाळून निषेध केला.
केंद्राचं शेतकरीप्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका त्यांनी केली. दुसरीकडे सरकारही केंद्राचे नवे कृषिकायदे राज्यात लागू करणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’चा नारा दिला होता. विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी यात भाग घेतला.
शेतकऱ्यांसाठी दहा आमदारक्या सोडू - राजू शेट्टी
आपल्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यासाठी दहा आमदारक्या सोडू, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. कांद्याचा मुद्दा घेत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. शिरूर तालुक्यातल्या पंचतळे इथे केंद्र सरकारच्या निर्यात बंदीविरोधात आंदोलन केलं. गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या. केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली.
अमरावती । शेतकरी रस्त्यावर
केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत कृषी विधेयक बिल मंजूर केले हे बिल शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे शेकडो शेतकरी रस्त्यावर आलेयत. दोन तास अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. नागपूर मुंबई महामार्ग अडवलेला. त्यामुळे महामार्गावर वांहनांच्या रांग लागल्या होत्या.
जालना । शेतकरी संघटनेने आंदोलन
जालन्यातील जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अर्धनग्न आंदोलन केलं. कृषी विधेयकाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. कागदपत्र पेटवून देऊन होळी देखील केली. आंबा आणि डाळिंब या फळपिकांचा आंबिया बहाराचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणीही त्यांनी केली.
अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईच्या केईएम रुग्णालयात शनिवारप....
अधिक वाचा