By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2020 11:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टग्रस्त सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री येणार म्हणून अतिवृष्टीने पिचलेल्या शेतकऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. सोयाबीन, तूर आणि कांद्याची नासलेली रोपं घेऊनच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत बोरी नदीवरील पुलावरून आमची विचारपूस काय करता? आमच्या शेतात, वस्तीत येऊन पाहणी करा, अशी सवालवजा विनंतीही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळीच सोलापूर येथील सांगवी खुर्दला पोहोचले. या भागात पाऊस झाल्यामुळे चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर न जाण्याचा सल्ला देत बोरी नदीवरील पुलावरच शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची गाऱ्हाणी ऐकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुलावरूनच शेतकऱ्यांचा संवाद साधला. मुख्यमंत्री भेटायला येणार म्हणून शेतकऱ्यांनी आधी त्यांना पुलावर भेटण्यास नकार देत नुकसान झालेल्या ठिकाणी भेटायला येण्याची मागणी केली. मात्र, मुख्यमंत्री न आल्याने नासलेली पिकं घेऊन शेतकरी सांगवी पुलावर गेले. मात्र, तिथेही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. केवळ दहाच शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची परवानगी दिली. यावेळी शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त झालेली पिकं मुख्यमंत्र्यांना दाखवत पुलावरून विचारपूस काय करता? जिथं आमचं नुकसान झालं तिथे येऊन पाहणी करा, अशी विनंती केली.
मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यांची निवेदनं स्वीकारली आणि नुकसानीची माहिती घेतली. तसेच पंचनामे सुरू झालेत का? स्थानिक पातळीवर मदत मिळाली का याची माहिती देतानाच सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. काळजी करू नका, असा धीरही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कृषी मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह स्थानिक आमदारही उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत.– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दोन शेतकऱ्यांना चेक
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगवीत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर दोन शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात चेकही दिला. तसेच तुम्हा सर्वांना शक्य तितक्या लवकर मदत देणार असल्याचंही स्पष्ट केलं.
Netflix हा ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वांच्याच अवडतीचा आहे. लॉकडाऊन दरम्यान चित्रपटगृ....
अधिक वाचा