By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2021 11:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतात कोरोनावरील लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) दिली आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील को-मॉर्बिट व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी महालसीकरण मोहिमेबाबत महामंधन केलं आणि यावेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली, ते म्हणाले की, “लसीकरणात कोणतंही VIP कल्चर चालणार नाही. सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनाच लस दिली जाईल”. पंतप्रधान म्हणाले की, “महालसीकरण मोहीम यशस्वी करुन भारत जगासाठी एक उदाहरण बनणार आहे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल. त्यामागचं पहिलं आणि प्रमुख कारण म्हणजे इतक मोठं महालसीकरण अभियान भारत राबवणार आहे, हे जगातील सर्वात मोठं आवाहन आहे. भारत हे अभियान यशस्वी करेल तेव्हा त्यातून इतर देशांना लसीकरणाची व्यवस्था कशी करायची याबाबतचा अंदाज येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून चार नव्या मेड इन इंडिया कोरोना लसींवर वेगाने काम सुरु आहे”.
पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ठ
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ठ केंद्र सरकारनं ठेवलं आहे. यामध्ये 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील नागरिक आणि 50 वर्षांखालील को-मॉर्बिट व्यक्तींना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या 16 मंत्रालयांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आलंय. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आपत्कालीन वापरासाठी अधिकृत केलेल्या दोन लसी भारतात तयार केल्या गेल्या आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भारताला लसीकरणाचा अनुभव, दुर्गम भागात पोहोचण्याची व्यवस्था कोरोना लसीकरणासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. 16 जानेवारीपासून आपण देशातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोदी म्हणाले, सर्वात आधी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येईल. त्यानंतर पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा बलाच्या जवानांना लसीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांच्या वरील लोक आणि जे जास्त करून संवेदनशील आहेत, त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
अफवांना आळा घालण्याची जबाबदार राज्यांची
येत्या काही महिन्यांत 30 कोटी लोकांना लसीकरण करण्याचा आमचा मानस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. कोरोना लसीबाबत बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत, त्या टाळा, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिलाय. पंतप्रधान म्हणाले की, अशा अफवांना लगाम घालणे ही राज्यांची जबाबदारी आहे. कोरोना लसीकरणासंदर्भात वैज्ञानिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण काम करत राहू, आम्ही त्याच दिशेने निघालो आहोत, असंसुद्धा मोदींनी अधोरेखित केलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 1 कोटी 10 लाख डोस तयार करण्याची ऑर्डर
पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे की, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करेल. यादरम्यान केंद्र सरकारने ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड या लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीचे 1 कोटी 10 लाख डोस तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. सीरमने दिलेल्या माहितीनुसार एका डोसची किंमत 200 रुपये असेल.
जगातील सर्वात किफायतशीर लस
सीरमला सरकारने ऑर्डर दिलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या एका डोसची किंमत 200 रुपये इतकी आहे. ही जगातील सर्वात किफायतशीर लस असल्याचे म्हटले जात आहे. जगातील अनेक देशांनी फायझर कंपनीच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. परंतु या लसीच्या एका डोसची किंमत 1450 रुपये इतकी आहे. तर मॉर्डनाच्या कोरोनावरील लसीच्या एका डोसची किंमत तब्बल 2700 रुपये इतकी आहे.
लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवला जाणार?
कोरोनाची लस घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. या बुकिंगनंतर तुम्हाला तुमच्या घराजवळचा बूथ दिला जाईल. यासाठी सरकारतर्फे लसीकरण अभियान सुरु केलं जाईल. यामध्ये दर 2 किलोमीटरच्या अंतरावर लसीकरणं बूथ उभारले जातील. बुकिंग केल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची वेळ आणि बूथचा पत्ता SMS केला जाईल. यानुसार तुम्ही लसीकरण बूथवर जाऊन लस घेऊ शकता.
बूथवर लसीकरण कसं होणार?
लसीकरण बूथवर 3 खोल्या असणार आहेत, पहिल्या खोलीत तुमची सगळी कागदपत्र तपासली जातील. ज्यामध्ये तुमचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्र असतील. एकाच व्यक्तीनं दोनदा लस घेऊ नये, आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद करता यावी यासाठी ही नोंदणी असेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या खोलीत तुम्हाला लस दिली जाईल. लस दिल्यानंतर तुम्हाला देखरेखीखाली ठेवलं जाईल. जिथं तुमच्यावर 30 मिनिटांपर्यंत लक्ष ठेवलं जाईल. लसीचा काही साईड इफेक्ट झालाच तर तातडीनं वैद्यकीय उपचार दिले जातील, नाहीतर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. पहिल्या लसीनंतर पुन्हा 28 दिवसांनी दुसरी लस घेण्यासाठी यावं लागणार आहे.
कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. “राज्यात कोरोना लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस देऊ. ज्या क्षणाला केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून देईल. त्यानंतर लगेचच आम्ही लसीकरण सुरु करु. यासाठी कोल्ड चेन ही तयार आहे. काही कमतरता असेल तर ती दूर करु,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
देशभरात 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ....
अधिक वाचा