By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2021 07:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनापासून मुक्त होण्यासाठी भारताने पूर्णपणे कंबर कसली आहे. देशातील लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहचवण्याच्या जोरदार तयारी सरकारने सुरू केली आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबईतही कोरोना प्रतिबंधक लस ठेवण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. नुकतंच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत कोरोना लसीच्या स्टोरेजबाबत माहिती दिली आहे.
सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज आहे. मुंबईतील चार प्रमुख रुग्णालयात कोरोनाची लस ठेवली जाणार आहे. यात मुंबईतील सायन, केईएम, नायर आणि कूपर अशा चार रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच कांजूरमार्ग येथील आरोग्य विभागाच्या इमारतीत 5 हजार स्के. फूट ही कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी या पाच ठिकाणी लसीची साठवणूक केली जाईल.
मुंबईत निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये 10 लाख लस स्टोअर करण्याची क्षमता आहे. या ठिकाणी -25 ते -15 डिग्री तापमानची सुविधा करण्यात आली आहे. तसेच लसीचे स्टोरेज करण्यासाठी कांजूरमार्ग येथे मुबलक जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 50 लाखांहून अधिक लस स्टोअर करता येऊ शकतील, असेही सुरेश काकाणी म्हणाले.
कोरोनाची लस आल्यानंतर 24 तासात आपल्याला पहिल्या टप्प्यातील लोकांना लस देता येईल. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 8 सेंटर तयार आहेत. उद्यापर्यंत आणखी 8 सेंटर तयार होतील. तसेच घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे दोन सेंटरमध्ये काम करेल. त्यामुळे अशाप्रकारे आपले 16 सेंटर तयार होतील. दरम्यान मुंबईत जवळपास 50 सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रत्येक सेंटर 2 शिफ़्टमध्ये काम करणार आहे.
बेड आणि स्टाफ
मुंबईतील कोव्हिड सेंटरमध्ये सद्यस्थितीत 75 टक्के बेड शिल्लक आहेत. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन सिस्टम देखील सज्ज आहे. रुग्ण वाढले तरी मुंबई सज्ज आहे. आपल्याकडे मुबलक स्टाफ उपलब्ध आहे.
तसेच ब्रिटनमधून नवा कोरोनाचा रुग्ण आला तरी त्यासाठी देखील पालिकेने तयारी केली आहे. सध्या 7 हजार रुग्ण आहेत. बेड रिकामे असले तरी आपण स्टाफला कायम ठेवलं आहे. कारण त्या स्टाफची आपल्याला केव्हाही गरज पडू शकते.
सर्वप्रथम लस कोणाला मिळणार?
शासकीय कर्मचारी : परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
खासगी कर्मचारी : रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे शनि....
अधिक वाचा