By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 08:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला सुरक्षेच्या विषयात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोविड आणि क्वॉरंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापुर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती. पण, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे हे पुन्हा पत्र फडणवीस यांनी पाठवले आहे. याबाबत कोणतेही खबरदारी घेताना राज्यातील सरकार दिसत नाही. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
फेब्रुवारी 2020 मध्ये महिला/युवतींना जाळून मारण्याच्या किमान 7 घटना घडल्या होत्या. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगावांत या घटना घडल्या होत्या. पुढे दिशा कायद्याची चर्चा माध्यमांमध्ये घडवली गेली आणि कालांतराने तो प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला गेला. पनवेल क्वॉरंटाईन सेंटरमध्ये बलात्कार (17 जुलै), सिंहगड क्वॉरंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून विनयभंग (20 जुलै), पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, क्वॉरंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग (20 जुलै), इचलकरंजी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये विनयभंग (15 मे), नंदूरबारमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, चंद्रपूरच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये युवतीचा विनयभंग, मालाड येथे क्वॉरंटाईन सेंटरमध्ये विनयभंग, मिरा-भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, मानखुर्द येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बडनेरा येथे शासकीय लॅबमध्ये महिलेच्या गुप्तांगाचा स्वॅब घेणे अशा अनेक घटना यापुर्वीच्या पत्रात नमूद करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे लागेल. कोणतीही घटना झाली तरी केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही, तर संबंधित दोषी अधिकार्यांवर सुद्धा कारवाई करायला हवी होती. पण, तसे कुठल्याही घटनेत झालेले दिसून येत नाही.आता पुन्हा एकदा तशाच घटना राज्यात सर्वत्र घडत आहेत. 30 जून रोजी येथे मंठा, जालना येथे लग्नाच्या तिसर्या दिवशी भर रस्त्यात 21 वार करून हत्या, 24 जुलै रोजी मौजे करंजविहिरे ता. खेड, पुणे येथे 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या, 25 जुलै रोजी नांदुरा, जि. बुलढाणा येथे 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, 26 जुलै रोजी तांबडी ता. रोहा येथे 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, 28 जुलै रोजी मुंबईत चालत्या गाडीत 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, 3 ऑगस्ट रोजी पाबळ, ता. शिरूर, पुणे येथे 11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, 4 ऑगस्ट : कराड येथे 10 वर्षांच्या चिमुकलीवर 54 वर्षांच्या नराधमाकडून बलात्कार, 4 ऑगस्ट : औरंगाबाद येथे 19 वर्षीय मुलीवर बलात्कार, 7 ऑगस्ट : चंद्रपूर येथे 16 वर्षीय मुलीवर बलात्कार, तिची आत्महत्या, 13 ऑगस्ट : जळगाव येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, धारावीत 5 वर्षीय मुलीवर 59 वर्षांच्या नराधमाकडून बलात्कार, रत्नागिरी खेड येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार, 9 सप्टेंबर : मानखुर्द कोविड सेंटरमध्ये स्वच्छता कर्मचार्याकडून 17 वर्षीय मुलीचा विनयभंग अशा अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने वाढणार्या आणि नित्य झालेल्या या घटना पाहता तातडीने कोविड सेंटर्ससंदर्भात एसओपी तयार करण्याची आवश्यकता आहे. महिला अत्याचाराच्या घटना होणार नाहीत, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन संवेदनशील असले पाहिजे. या घटनांकडे आपण गांभीर्याने लक्ष द्याल आणि आवश्यक त्या उपाययोजना कराल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.
राज्यातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100 टक्के भरली जाणार आहे. त्यानुस....
अधिक वाचा