By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 31, 2020 12:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची CISF च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपी केंद्रात प्रतिनियुक्तीवर चालले आहेत, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. छोट्या छोट्या कामांतही सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला आहे, असा आरोप फडणवीसांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
“राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चालला आहे. त्यामुळेच सुबोध जैस्वाल यांनी नाराज होऊन प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारने स्वीकारली आहे. यामुळे राज्य सरकारने समजून घेतलं पाहिजे की पोलिसिंग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलं, तरीही पोलीस विभागाला स्वायत्तता दिली आहे” असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.
“गृहमंत्र्यांकडे सुपरवायजरी (देखरेखीचं) काम आहे. पण आता बदल्या असो, छोट्या छोट्या कामांतही हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळेच अशाप्रकारे डीजीपींनी प्रतिनियुक्ती मागितली आहे. राज्यात पहिल्यांदाच असं घडलंय की सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक गेले. पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल” अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला.
चंद्रकांत पाटलांकडूनही ठाकरे सरकार लक्ष्य
सुबोध कुमार जैस्वाल हे आपल्या पदावरुन पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या पराक्रमी अशा राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) च्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यातच बोलून दाखवली होती. जैस्वाल यांच्याकडे ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेतील कामाचा अनुभव होता. त्यांनी 2018 मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. यानंतर त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली होती, गेल्या काही महिन्यांतील राज्यातील घटनांमुळे सुबोध कुमार जैस्वाल यांच्या भावनांना मोठा धक्का पोहोचला होता. सरकारच्या बहिऱ्या आणि कुचकामी कारभाराला कंटाळूनच जैस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या रुपातील कोरोना विषाणूमुळे (Corona New Strain) जगभरातील ....
अधिक वाचा