By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2020 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करुन कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे आता शेतकरी आपलं आंदोलन आणखी आक्रमक करणार आहेत. शेतकरी नेत्यांच्या बैठकीत रविवार आणि सोमवारी आंदोलन आणखी आक्रमक करण्यासंदर्भात रणनिती तयार करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घोषणा केली आहे की, रविवारी 'दिल्ली चलो' मोर्चा सुरु करण्यात येणार असून 14 डिसेंबर रोजी शेतकरी उपोषण करणार आहेत.
रविवारी शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा
रविवारी सकाळी 11 वाजता राजस्थानच्या शाहजहांपूरचे शेतकरी जयपूर-दिल्ली राजमार्गावरून दिल्ली चलो मोर्चाला सुरुवात करतील. संयुक्त शेतकरी आंदोलनाचे नेते कमल प्रीत सिंह पन्नू यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, 'उद्या (रविवारी) 11 वाजता शाहजहांपूर (राजस्थान) येथून जयपूर-दिल्ली महामार्गावरील वाहनांना रोखण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर आंदोलन करणार आहेत.'
14 तारखेला शेतकऱ्यांचं उपोषण
कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी 14 डिसेंबर रोजी उपषोण करणार आहेत. शेतकरी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपोषण करणार आहेत. संयुक्त शेतकरी आंदोलनाचे नेते कमल प्रीत सिंह पन्नू यांसदर्भात माहिती देत म्हटलं की, "सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि अध्यक्ष स्टेजवर 14 तारखेपासून उपोषणासाठी बसतील. आम्ही आमच्या आई आणि बहिणींसाठी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांच्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचं आयोजन केल्यानंतरच आम्ही त्यांना या आंदोलनात सहभागी करणार आहोत."
कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम
शेतकरी नेत्यांनी सरकारसोबत चर्चा करण्याचा मार्ग अद्यापही खुला असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगत म्हटलं की, ते सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत. परंतु, त्याआधी लागू करण्यात आलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी चर्चा केली जाईल. सिंघू बॉर्डरवरील संवादाता संम्मेलनाला संबोधित करताना शेतकरी नेते कंवलप्रीत सिंह पन्नू यांनी सांगितलं की, देशातील अनेक भागांतून अनेक शेतकरी येथे येत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आंदोलन आणखी आक्रमक करण्यात येणार आहे.
कृषी कायद्यात बदल करायला तयार, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा: केंद्रीय कृषी मंत्री
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेले 16 दिवस दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, "या कायद्यातील तरतुदींना आक्षेप असतील तर त्यांचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेचा मार्ग अवलंबावा."
ते पुढे म्हणाले की, "मी शेतकरी नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी ही कोंडी फोडावी. सरकारनं चर्चेसाठी एक पाऊल पुढं टाकलंय. त्यांच्या शंकेचं निराकरण करण्यात येईल. या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांनाही होत आहे. त्यात देशात कोरोनाचं संकट आहे. सामान्य जनताही भरडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं."
कोरोनाच्या काळात शाळा बंद करण्यात आलेल्या असून, शाळांनी पालकांकडे फीचा तगा....
अधिक वाचा