By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 04:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दळणवळण आणि संपर्क क्षेत्रात भारत आज जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि सध्या आमुलाग्र बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात थेट परदेशी गुंतवणुकीची गरज आहे असे मत केंद्रीय माहिती आणि दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत आज ‘इनवेस्ट डिजिकॉम-2019’ या चर्चासत्रात ते बोलत होते. सरकारने अलीकडेच कॉर्पोरेट करात कपात केली आहे. यामुळे परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उत्पादन क्षेत्रालाही करातून दिलेली सवलत या क्षेत्रांसाठी प्रोत्साहन देणारी ठरेल असे ते म्हणाले. ॲपल आणि इतर टेलीकम्युनिकेशन कंपन्यांनी भारतात येऊन उत्पादन करावे आणि निर्यातही करावी असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या काही वर्षात देशातल्या थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2019 या आर्थिक वर्षात देशात 64 अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक आली त्यापैकी 2.67 अब्ज गुंतवणूक टेलीकॉम क्षेत्रात आली आहे तर इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये 6.4 अब्ज इतकी थेट परदेशी गुंतवणूक आली आहे असे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग आणि अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल इंडियासाठी केला जात आहे असे त्यांनी सांगितले. भारतात सध्या टेलिकॉम क्षेत्रासाठी अत्यंत अनुकूल काळ असून परदेशी गुंतवणुकदारांनी येथे येऊन गुंतवणूक करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खार पश्चिम येथील जिमखान्याजवळील आतिशय दाटीवाटीच्या भागातील इमारत कोसळण....
अधिक वाचा