ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लॉकडाऊनंतरच्या पहिल्या स्थायी समितीत राजकीय कुरघोड्याच,मुंबईकरांच्या कल्याणाचे प्रस्ताव कागदांवरच

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2020 10:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लॉकडाऊनंतरच्या पहिल्या स्थायी समितीत राजकीय कुरघोड्याच,मुंबईकरांच्या कल्याणाचे प्रस्ताव कागदांवरच

शहर : मुंबई

मुंबईमध्ये कोरोनाचे संकट आहे. शहरातील विकासकामांचे तब्बल 600 हून अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. असे असताना स्थायी समितीत मात्र भाजपा विरुद्ध शिवसेना अशा राजकारणावर भाजपाच्या एका नामनिर्देशित सदस्याचे पद रद्द करण्यात तब्बल दोन ते अडीच तास फूकट घालवण्यात आले. यामुळे मुंबईकरांच्या प्रश्नापेक्षा राजकीय पक्षांना कुरघोडी करण्यातच स्वारस्य असल्याचे समोर आले आहे. याबाबत हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर शिवसेनेने पालिकेच्या नियमानुसार हे पद रद्द केल्याचा दावा केला आहे.

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. या खर्चाच्या मंजुरीचे तसेच मुंबईमधील विकास कामांचे 600 हून अधिक प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या सहा महिन्यात स्थायी समितीची बैठक झालेली नाही. एकाच वेळी 600 हून अधिक म्हणजे 674 प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याने भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने फिजिकल मिटिंग घेताना प्रत्येक प्रस्ताव मतदान घेऊन निकाली काढावा असे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी (21 ऑक्टोबर) स्थायी समिती बैठक होत असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीत नामनिर्देशित सदस्य राहू शकत नसल्याने भाजपच्या भालचंद्र शिरसाट यांचे पद रद्द करावे अशी मागणी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. या मागणीला शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्र्रवादी, समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला. तर भाजपाने शिरसाट यांचे पद रद्द करण्यास विरोध केला. सर्व सदस्यांचे आणि कायदा विभागाचे मत जाणून घेतल्यावर विशाखा राऊत यांनी मांडलेला हरकतीचा मुद्दा ग्राह्य धरत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिरसाट यांचे स्थायी समितीमधील पद रद्द केले. त्यानंतर शिरसाट यांना सभागृहाबाहेर जाण्याची विनंती केली. मात्र शिरसाट हे सभागृहाबाहेर गेले नसल्याने अखेर स्थायी समितीची सभा इतर कोणतेही कामकाज न करता तहकूब करण्यात आली.

याबाबत बोलताना हा केवळ भाजपविरोधातील द्वेष आणि सुडाचे राजकारण असल्याचा आरोप भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. या आधीही सत्ताधारी शिवसेनेने के पी नाईक हे नामनिर्देशित सदस्य असताना त्यांची पाच वर्षे स्थायी समिती सदस्य नियुक्ती कशी केली गेली असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. पालिका 1888 च्या कलमानुसार चालते. त्यामधील नियमानुसार स्थायी समिती ही महत्त्वाची समिती आहे. त्यातील निर्णय हे मतदानाने घ्यावे लागतात. यामुळे अशा समितीवर मतदानाचा अधिकार असलेल्या सदस्यांची नियुक्ती करणे अपेक्षित असल्याने शिरसाट यांचे पद रद्द करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. आम्ही भाजप सदस्यांना सभागृहात अनेक विषय मंजूर करायचे आहेत असे सांगितले, मात्र भाजपचे सदस्य मान्य करत नसल्याने अखेर कोणतेही विषयावर चर्चा न करता सभा तहकूब करावी लागली, असे जाधव यांनी सांगितले.

पुढे  

मुंबईतील नागपाड्यातील मॉलमधील आग धुमसतीच, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी
मुंबईतील नागपाड्यातील मॉलमधील आग धुमसतीच, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमार....

Read more