By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 07:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (18 सप्टेंबर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची पायाभरणी होणार आहे. दुपारी 3 वाजता दादर येथील इंदू मिल येथे हा कार्यक्रम होणार आहे. आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम असणार आहे. याआधी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला होता.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आक्रमक झाले आहेत. याआधी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जर होत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू, असं मत व्यक्त केलं होतं.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी मात्र स्मारकाच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, “मुंबई महानगरपालिकेने वाडिया रुग्णालयाचे 98 कोटी रुपयांचे अनुदान थकवल्याने हे रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा.”प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेला आनंदराज आंबेडकर यांनी मात्र कडाडून विरोध केला होता.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते?
“कोर्टाने जे म्हटलं आहे की पुतळ्याच्या उंचीसाठी तुमच्याकडे पैसे आहेत. माझी कोर्टाला नम्र विनंती आहे, इंदू मिलच्या जागेत बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याबाबत वाद आहे, माझाही त्याला विरोध आहे. ती इंदू मिलची जागा ही intellactual cause साठी वापरली गेली पाहिजे. डर्बनमध्ये भारताला एक वन मॅन आर्मी म्हणून मी ज्यावेळी हरवलं होतं, सामाजिक विषयांवर. त्यावेळी वाजपेयींनी हे कसं शक्य झालं हे सांगितलं.
मी म्हणालो, तुमच्याकडे पर्यायी स्कूल ऑफ थॉट नाही. त्यामुळे भारत सरकार हे प्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे त्यांना डिफीट करणं सोपं आहे. हे थांबवण्यासाठी पर्यायी विचाराचे स्कूल ऑफ थॉट हवेत.
अटलबिहारी वाजपेयी हे अनेकदा चैत्यभूमीला येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांनी ती जागा माहित आहे. म्हणूनच त्यांनी ती जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी त्यांनी दिली होती. मात्र या ठिकाणच्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली आहे. त्यामुळे हायकोर्टाला विनंती आहे की जो निधी पुतळ्यासाठी किंवा सुशोभीकरणासाठी दिला असेल हा निधी वाडिया हॉस्पिटलसाठी वर्ग केला आहे असे आदेश त्यांनी काढावे, अशी माझी विनंती आहे.”
आव्हान स्वीकारलं तर दोन वर्षात आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण होईल : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी केल्यानंतर आव्हान स्वीकारलं तर दोन वर्षात आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण होईल, असं मत व्यक्त केलं होतं. शरद पवार म्हणाले होते, “आंबेडकरांच्या स्मारकाचं केवळं 25 टक्के काम झालं आहे. अजून 75 टक्के काम बाकी आहे. त्यामुळे जर आव्हान म्हणून हे काम स्वीकारलं तर पुढील दोन वर्षात काम होणं अशक्य नाही. हे स्मारक जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरले.”
तामिळनाडू येथील विष्णुमंदिरातून १९७८ मध्ये चोरीला गेलेल्या विजयनगर कालखं....
अधिक वाचा