By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 29, 2019 01:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये कमालीची चुरस लागल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे आपल्या मंडळांकडे भाविकांची अधिकाधिक गर्दी खेचून घेण्यासाठी किंवा भाविकांना आकर्षित करण्यासाठी मग ही गणेश मंडळे विविध दावे करून त्याचा पद्धतशिर प्रचार करतात. त्यालाच ‘मार्केटिंग कौशल्ये’ असे म्हणतात. यात ‘नवसाला पावणारा’, इच्छापूर्ती करणारा’ अशा टॅगलाइन वापरुन श्रीगणेशाला ‘राजा’, ‘महाराजा’ची उपाधी देत काही गणेश मंडळे प्रचार करताना दिसतात. मात्र मंडळांचे हे मार्केटिंग कौशल्य अंधश्रद्धेकडे झुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मंडळावर जादू टोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे नवासाच्या बहाण्याने कोणत्याही भक्ताने स्वत:ला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यास, त्यास उद्युक्त केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची तरतूद ही करण्यात आली आहे.
गेल्या 10 वर्षात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली दिसत आहे. त्यातूनच काही प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ भविकांना या ना त्या मार्गाने आकर्षित करताना आढळतात. त्यात ‘नवसाला पावणारा राजा’, ‘इच्छापूर्ती करणारा महाराजा’ असा जाहीर प्रचार केला जातो. मग आपली मनोकामना पूर्ण व्हावी, म्हणून काही भाविक अघोरी प्रकार करतात, शरीराला यातना देणारे मार्ग अवलंबितात. काही किमी अंतर अनवाणी चालत जावून त्या गणरायाचे दर्शन घेणे, तेथे लोटांगण घालत जाणे, असे काही किमी अंतर सतत साष्टांग नमस्कार घालीत जाणे, असे मार्ग अवलंबितात. अगदी मुसळधार पाउस कोसळत असला किंवा शरीराला कितीही त्रास झाला तरी भाविक सहन करतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, भाविक कोणतीही मनोकामना बाळगून हे प्रकार करीत आहे, हे त्याचे त्यालाच ठावूक असते. एखाद्या नवसात प्रतिस्पर्धकाचे नुकसान करण्याचा म्हणजेच बरे वाईट करण्याचाही विचार असू शकतो. तसे असेल तर नवस करणार्यासह त्यास प्रोत्साहन देणार्यांवरही कारवाई होऊ शकते. त्याच प्रकारे खोटी जाहिरात करून जोर जबरदस्तीने पैसे लाटण्याचा प्रकार घडत असेल तर तो निश्चित गुन्हा ठरू शकतो.
तथापि, अद्याप तरी अशा प्रकारांवर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु श्रीगणेश भक्तांच्या श्रद्धेचा फायदा घेण्यासाठी मनमानी करण्याचे प्रकार अप्रत्यक्षरित्या वाढीस लागल्याचे दिसत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणार्या जागरूक समिती वा कार्यकर्त्यांमुळे उघडपणे चमत्काराचे दावे कोणी करत नाहीत. पण शाब्दिक दावे म्हणजे मौखिक दावे पद्धतशिरपणे पसरविले जात आहेत. यामागे श्रद्धेसोबतच मोठे अर्थकारण लपलेले असल्याचे ‘अनिस’च्या कार्यकर्त्यांचे मत आहे. शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देवून योग्य ती पावले उचलायला हवीत. आमचा श्रद्धेला विरोध नाही, तो प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. मात्र श्रद्धेचा बाजार मांडला जातो. तेव्हा लोकांनी ही वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला हवा, असे अनिसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
बेस्ट कामगारांच्या मागण्यासंदर्भात शिवसेनेने केलेल्या वाटाघाटी बेस्ट सं....
अधिक वाचा