By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 09:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्याच्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस सुरूच आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून आजही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे.मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. पावसामुळे शहर भागात गारवा पसरला. मात्र ऑफिसमधून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे पावसामुळे हाल झाले. यामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय. विदर्भातही अवकाळी पाऊस सुरू आहे. बुलढाण्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी आहे.
बुलढाणा जिल्ह्यातही काही भागात गारपीट झालीय. गारपीटीमुळे गहू, हरभरा या पिकांना फटका बसला. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटलाय.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. पंढरपुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज आज खरा ठरला.
उत्तर रायगडलाही अवकाळीने झोडपलंय. सुधागडसह कर्जत, खालापूर, पनवेलमध्ये गारांसह जोरदार पाऊस झाला. तर अनेक भागात वीजपुरवठा खंडित झालाय. दक्षिण रायगड पाठोपाठ उत्तर रायगडलाही संध्याकाळी अवकाळी पावसानं झोडपलं. माथेरानमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पावसानं कडधान्य पिकासह आंब्याचंही नुकसान होण्याची भीती व्यक्त होतेय.
कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांश भागात अवकाळी पाऊस झालाय. पिकांचं मोठं नुकसान झालंय. भुदरगड तालुक्यात जोरदार गारपीट झालीय. गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यात पीकं भुईसपाट झाली आहेत.
गारपिटीमुळे अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या खंडूखेडा या गावाला अक्षरशः काश्मीरचं स्वरूप आलं होतं. परिसरात पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. मेळघाटात सर्वदूर पाऊस कोसळत असतांना खंडूखेडा गावात प्रचंड गारपीट झाली. जमिनीवर शेतात अक्षरशः बर्फ साचल्यासारखं दिसत होतं. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातलं पीक हातचं गेलंय. गहू, हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने झोडपलं.भीमाशंकर परिसरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पावसाने बळीराजा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येची (Corona Patient) आकडेवारी पुन्हा वाढतेय. लसीकरण अद्य....
अधिक वाचा