By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 20, 2021 10:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यभरात कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) सुरुवात झाली असली तरी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात लसीच्या सुरक्षिततेविषयी मोठ्याप्रमाणावर साशंकता असल्याची उदाहरणे दररोज समोर येत आहेत. विशेषत: ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोव्हॅक्सीन लस घेण्यास नकार दिला जात आहे.
मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जे.जे. रुग्णालय हे कोव्हॅक्सीन लसीकरणाचे शहरातील एकमेव केंद्र आहे. मंगळवारी याठिकाणी 100 जणांना लस दिली जाणे अपेक्षित होते. मात्र, यापैकी केवळ 13 आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी आले. तेदेखील रुग्णालयातील कर्मचारीच होते.
वरिष्ठ डॉक्टरांच्या पुढाकारानंतर कर्मचारी कोव्हॅक्सीन घेण्यास तयार
जे.जे. समूहातील सुमारे 7750 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मात्र, याठिकाणी कोव्हॅक्सीन लस मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी लस घेण्यास तितकेसे उत्सुक नाहीत. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेत लस टोचून घेतल्यामुळे लसीकरणाचा आकडा कसाबसा 39 पर्यंत पोहोचला. मात्र, मंगळवारी लसीकरणासाठी नोंदणी झालेले अनेकजण रुग्णालयात फिरकलेच नाहीत. जे.जे. रुग्णालयात कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोणताही त्रास जाणवलेला नाही. त्यामुळे आगामी काळात कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी अधिकाअधिक कर्मचारी तयार होतील, अशी आशा आहे.
औरंगाबादेत 90 जणांना कोरोना लसीची रिअॅक्शन
औरंगाबादेत 90 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीची रिअॅक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. येथील 352 स्वयंसेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती. यापैकी तब्बल 90 जणांना रिअॅक्शन, ताप, मळमळ आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे.
भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सीन घेण्यास ‘त्या’ डॉक्टरांचा नकार
कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे या लसीच्या परिणामकारकतेबद्दल अद्याप साशंकता आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने या लसीला परवानगी दिल्यामुळे वादही निर्माण झाला होता. मात्र, लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनीच ही लस टोचून घेण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता.
‘लसीकरणासाठी पुढाकार घ्या, अशिक्षित लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवा’
कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना केले होते.
राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रमक तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन आणि तिसऱ्या टप्प्यात व्याधी असणाऱ्या (को-मॉर्बिडिटी) असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल.
देशात कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) सुरुवात झाल्यानंतर आता लसीच्या दुष्परिणाम....
अधिक वाचा