By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 06, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर आम्ही ठाम असल्याचे भारतीय वायूदलाने स्पष्ट केले आहे. नुकत्याच एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या सर्व एफ-१६ विमानांची मोजणी झाल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हा पाकिस्तानच्या ताफ्यातील कोणतेही एफ-१६ विमान गायब नसल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे. आमच्याकडे पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याचे परिस्थितीजन्य पुरावे असल्याचे वायूदलाने सांगितले. विमानातील कॅमेरा आणि रडारच्या पुराव्यानुसार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा वेध घेतल्याचे स्पष्ट होत आहे. यानंतर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-२१ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. याशिवाय, आगाऊ सूचना देणारी प्रणाली ( AWACS) आणि एफ-१६ कोसळल्याच्या जागेवरील पुरावेही आमच्याकडे असल्याचे भारतीय वायूदलाचे म्हणणे आहे. २७ फेब्रुवारीनंतर पाकिस्तानी अधिकारी एका दुर्घटनाग्रस्त विमानाची पाहणी करतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्या छायाचित्रांमधील अवशेष नक्कीच मिग-२१ विमानाचे नाहीत. याशिवाय, हल्ल्याच्या दिवशी एक विमान परतले नसल्याचा पाकिस्तानी लष्कराचा वायरलेस संदेशही भारतीय यंत्रणांच्या हाती लागला होता.
भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारीला पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला होता. यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांच्या तुकडीने भारतीय हद्दीत प्रवेश केला. यामध्ये एफ-१६, जेएफ-१७ आणि मिराज ३, मिराज ५ या विमानांचा समावेश होता. ही विमाने भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच भारतीय वायूदलाला कळवण्यात आले. त्यानुसार भारताच्या सुखोई ३० एमकेआय, मिराज-२००० आणि मिग-२१ या विमानांनी पाकिस्तानच्या विमानांवर प्रतिहल्ला केला. भारताच्या या प्रतिहल्ल्याने गांगरलेल्या पाकिस्तानी विमानांनी लगेच पळही काढला. मात्र, अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा पाठलाग केला. पाकव्याप्त नौशेरा सेक्टरमध्ये असताना मिग-२१ विमानातून डागण्यात आलेल्या आर७३ आर्चर या क्षेपणास्त्राने एफ-१६ विमानाचा वेध घेतला होता. त्यावेळी उत्तर दिशेला पाकचे एक जेएफ१७ विमानही होते. यावेळी AWACS प्रणालीने काही मिनिटांच्या फरकाने टिपलेल्या छायाचित्रांमध्येही एफ-१६ विमान नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा भारतीय वायूदलाने केला आहे.
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रत....
अधिक वाचा