By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 06:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच फायदा उठवण्याचं काम ऑक्सिजन गॅसची निर्मिती करणारे आणि त्याचा पुरवठा करणाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी जम्बो सिलेंडर केवळ 300 ते 350 रुपयात भरून मिळत होते. आता मात्र यामध्ये वाढ करण्यात आली असून आता हेच दर 750 ते 800 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडेल आणि प्रसंगी केवळ ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येतील हे नक्कीच धक्कादायक असेल, अशी प्रतिक्रिया मुंबईतील प्रसिद्ध निरामय क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर अमित थाडाणी यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना थाडाणी म्हणाले की, मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी माझ्या खारघर येथील रुग्णालयात एक धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या माझ्या रुग्णालयात जवळपास 25 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेतं आहेत. यातील जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत त्यांना सध्या इतर रुग्णांच्या तुलनेत जवळपास तिप्पट ऑक्सिजनची गरज लागत आहे. मागील आठवड्यात आम्ही ज्या सिलेंडर पुरवठादाराकडून नेहमी सिलेंडर घेत असतो त्याने अचानक सिलेंडर उपलब्ध नसल्याचं कळवलं. आम्ही सलग दोन दिवस यासाठी विविध ठिकाणाहून सिलेंडर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ते होतं नव्हतं. मात्र त्यादिवशी संध्याकाळपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नसता तर केवळ ऑक्सिजन अभावी रुग्णालयातील रुग्णांवर मृत्यू ओढवू शकला असता. सुदैवाने असा कोणताही प्रकार घडला नाही.सध्या आम्ही आमच्या रुग्णालयात राखीव सिलेंडरचा साठा वाढवला आहे. सध्या मुंबईसह उपनगरात अनेक रुग्णालयात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत पाऊल उचलण्यात यावं. सध्या ऑक्सिजन गॅसची निर्मिती करणारे आणि पुरवठादार यांनी अचानक सध्या राज्यात ओढवलेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्याचं काम केलं आहे. गॅस सिलेंडर भरून देण्याचे दर या सर्व व्यवसायिकांनी वाढवले आहेत. जर हे दर वाढत राहिले तर रुग्णांवर उपचार करणं अवघड होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावते. यासोबत राज्यात जे ऑक्सिजनचे प्लांट आहेत त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या अशी अनेक रुग्णालय आहेत जे स्वतःचा प्लांट करण्यासाठी तयार आहेत. परंतु त्या प्लांटसाठी होणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन डॉक्टरांना प्लांट तयार कारणासाठी सबसिडी दिल्यास, सध्या जी समस्या निर्माण झाली आहे ती कमी होण्यास मदत होईल, असंही डॉ. थाडाणी यांनी म्हटलं.
मनसेने सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्यासाठी केलेल्या सविनय का....
अधिक वाचा