By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 27, 2020 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक सेवेत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. पश्चिम रेल्वेने महिलांच्या सोयीसाठी सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर मध्ये लेडीज स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गर्दीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच लेडीज स्पेशल लोकल मुंबईमध्ये चालवली जाणार आहे.काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लोकलसेवेमध्ये वाढ करून, 350 ऐवजी 500 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. आज त्यातही सोमवारपासून सहा फेऱ्यांची वाढ पश्चिम रेल्वेने केली आहे. या सर्व फेऱ्या धीम्या मार्गावरून धावतील. तसेच त्या चर्चगेट ते विरार या स्थानकांच्या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. याच सहा लोकल पैकी दोन लोकल या लेडीज स्पेशल लोकल असणार आहेत.
22 मार्च पासून लोकल बंद आहेत. तेव्हापासून लेडीज स्पेशल लोकल चालवण्यात आलेली नाही. मात्र इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच लेडीज स्पेशल लोकल चालवण्याचा निर्णय हा पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या लोकल पैकी एक लोकल सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी विरार वरून चर्चगेटच्या दिशेने जाईल. ती लोकल धीम्या मार्गावरून 9 वाजून 22 मिनिटांनी चर्चगेट स्थानकात पोहोचेल. तर दुसरी लेडीज स्पेशल लोकल ही संध्याकाळी चर्चगेट स्थानकावरून 6 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. हीदेखील धीमी लोकल असून ती 7 वाजून 55 मिनिटांनी विरार स्थानकात पोहोचेल.
पश्चिम रेल्वेने जरी लेडीज स्पेशल लोकल चालवण्याचा निर्णय घेतला असला तरी मध्य रेल्वेने याबाबत अजूनही काहीही विचार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर अत्यावश्यक सेवेत प्रवास करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अजूनही लेडीज स्पेशल लोकलची वाट पहावी लागेल.
प्रत्येक भारतीयापर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी रुपये आहे, स....
अधिक वाचा