By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 08:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nanded-Waghala
नांदेड येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या विरोधात मी प्रचार करतो आहे याचे कारण एकच आहे ते म्हणजे माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेचा गळा केसाने कापला आहे. या जनतेने त्यांना भरभरून मतं दिली आता मात्र मोदींनी विश्वासघात केला त्याचमुळे मी त्यांच्या विरोधात प्रचार करतो आहे असे म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
मी कुणाचाही प्रचार करायला आलो नाही. मोदी-शहा ही दोन नावे देशाच्या राजकीय क्षितिजावरून दूर जाणे आवश्यक आहे व त्यासाठी आपण मतदान करावे, ही माझी विनंती आहे, असे आवाहन राज यांनी यावेळी केले. मोदी यांच्या राजस्थानातील चुरू येथील भाषणाचा दाखला देत राज यांनी टीकास्त्र सोडले. चुरू येथील व्यासपीठावर शहीद जवानांचे फोटो लावण्यात आले होते. त्यावर बोट ठेवत ’शहीद जवानांचे फोटो लावून भाषणे करायला लाजा कश्या वाटत नाहीत?’ असा संतप्त सवाल राज यांनी केला.
बालाकोटच्या वेळी आमच्या वैमानिकांना चुकीची माहिती दिली गेली, त्यानंतर अमित शाह म्हटले 250 दहशतवादी मारले गेले. अमित शाह यांना कसे काय कळलं? हवाई दलाच्या प्रमुखांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की नेमके किती लोक मारले गेले ते आम्हाला सांगता येणार नाही. जो मदरसा उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जातो आहे तो मदरसा सुरक्षित असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना एवढी चांगली संधी जनतेने दिली होती. मात्र या संधीची त्यांनी माती केली, जनतेशी ते कायम खोटंच बोलत आले आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही भाजपाच्या नेत्यांनी देशद्रोही म्हणणं कमी केलं नाही असाही आरोप राज ठाकरेंनी केला. योगी आदित्यनाथ असं कसं म्हणू शकतात की आपलं नौदल, पायदळ, वायुदल ही मोदींची सेना आहे. योगी आदित्यनाथ अशी भाषा कशी काय वापरू शकतात? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
विर्दभ, मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या करत आहे, त्याच्यापुढच्या समस्या संपलेल्या नाहीत. मात्र त्याबद्दल पंतप्रधान काही बोलले का? नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून आणि युतीचे सरकार राज्यात आल्यापासून महाराष्ट्रात 14 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केली. आमच्या ग्रामीण महाराष्ट्राताला तरूण गाव सोडून जातो आहे. हेच का अच्छे दिन? हेच का मोदींनी दाखवलेले स्वप्न? असे प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केले. नांदेडमध्ये राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली या सभेत त्यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आणि मोदींनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.
ठाण्यामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून पडून एका पाच वर्षांच्य....
अधिक वाचा