By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 07:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
राज्यातील अडीच हजाराहून अधिक खाजगी छोटी रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने खाजगी छोट्या रुग्णालयांना सवलत देण्याचे कबूल केले असताना त्यांच्याकडून दर आकारणी केली जात आहे. यामुळे ही रुग्णालये बंद करण्याची वेळ आलेली आहे. सात दिवसात राज्य सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर राज्यातील डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू होणार आहे, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्य सरकारला दिलेला आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासकीय डॉक्टरांसोबत खाजगी डॉक्टरांनी सेवा सुरू करावी यासाठी राज्य सरकारने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या खाजगी डॉक्टरांना आवाहन केलं होतं. तसेच त्यांना संपूर्ण सुविधा पुरवण्याचे आश्वासन सुद्धा दिलं होतं. मात्र आज पाच महिने पूर्ण होऊन सुद्धा सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे राज्यातील अडीच हजाराहून अधिक छोटी रुग्णालय बंद पडण्याच्या स्थितीत आलेली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील खाजगी रुग्णालये अनेक अडचणींचा सामना करत आहेत. सरकारने खासगी रुग्णालयांवर लादलेल्या दर सक्तीमुळे लघू मध्यम आकाराची खाजगी रुग्णालय बंद होताहेत.
सरकारने आयसीयूचे दर वाढवून द्यावेत. जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट शुल्क आणि वीज दरामध्ये सवलत द्यावी. डॉक्टर वापरत असलेले PPE किट आणि मास्कचे दर नियंत्रित ठेवण्याचं आश्वासनही दिलं होतं. शिवाय ऑक्सिजनचे दर हे केंद्र सरकारच्या नियमानुसार केंद्रीत ठेवण्याचं मान्य केलं होतं. या कुठल्याच गोष्टींची पूर्तता सरकारने केली नसल्यामुळे डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कोरोनामध्ये खाजगी डॉक्टर सेवा बजावत असताना अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. त्यांना विमा संरक्षण नाही. या संपूर्ण परिस्थितीची माहिती आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना वारंवार देण्यात येत आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे येत्या सात दिवसांमध्ये जर राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. तर खासगी डॉक्टर स्वतः होऊन क्वॉरंटाईन होऊन सरकारचा निषेध करणार आहेत.
कोरोनाचे संकट समोर पाहिल्यानंतर आम्ही शासनासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र शासनाने सरकारी डॉक्टरना दिलेली सुविधा खाजगी डॉक्टर्सना दिलेली नाही. कोरोनामध्ये सेवा बजावत असताना अनेक खाजगी डॉक्टर मृत्युमुखी पडलेले आहेत. दुर्दैवाने शासनाकडे त्यांची नोंद देखील झालेली नाही. अशा परिस्थितीत काम करत असताना खासगी रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण होत आहे. तसेच वाढलेले खर्च, यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. याची संपूर्ण माहिती आरोग्यमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. मात्र आमच्या मागण्यांकडे त्याने दुर्लक्ष केले आहे. गेल्या महिन्यापासून टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र तरीही सरकारला जाग आली नाही तर येत्या सात दिवसांमध्ये आम्ही राज्यव्यापी आणि लक्षवेधी आंदोलन करू आणि याची दखल सरकारला घ्यावी लागेल, असा इशारा ठाणे जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम महाविकास आघाड....
अधिक वाचा