By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 08:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई शहरासह उपनरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळपासूनच बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. तसेच येत्या 24 तासांतही मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर वरळीच्या बीएमसी क्वॉर्टसमध्ये पाणी शिरलं.मुंबईमध्ये काल सध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. मुंबई मधील परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी, मालाड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनाही नदीचं रूप आलं आहे. अंधेरी येथील सब वेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे भरलेल्या पाण्यात काही रिक्षा वाहून आल्या तर बेस्टची बस देखील अडकून पडली होती.
मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनीवर होण्याची शक्यता आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. कारण मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे. सायन रेल्वे स्थानकांतील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. अशाच प्रकारे सखल भागात असलेल्या रेल्वे स्थानकांवर देखील पाणी भरले आहे. सध्या लोकडाऊनमुळे सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसला तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र लोकल सुरू आहेत. मात्र मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसण्याची शक्यता आहे.
प्रचंड पाऊस पडल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत/कसारा, वाशी ते पनवेल आणि अंधेरी ते विरार शटल सर्व्हिस सुरू आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टी च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.#MumbaiRains
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 23, 2020
मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरलं असल्यामुळे बेस्ट बसची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत सकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा परिसरात 122.2 मिमी आणि सांताक्रुझ येथे 273.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मुंबईप्रमाणेच कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची त....
अधिक वाचा