By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रत्नागिरी - कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सामंत यांनी विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे आवश्यक आहे, असे सांगत त्यासाठी एक समिती गठीत करावी असे आदेश दिले. मुंबई विद्यापीठाशी ८२६ महाविद्यालये संलग्न असून एवढ्या महाविद्यालयांमुळे प्रशासनावर ताण पडत असल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल आणि मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल. यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे आवश्यक आहे, असे आढावा बैठकीत एकमत झाले. कोकण विभाग हा समुद्र किनारपट्टी असलेला भाग आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक असे व्यवसायिक अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेता येईल, असेही यावेळी सूचविण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रामुळे कोकणचे शैक्षणिक प्रश्न सुटणार नाहीत असे प्रतिपादन कोकण विद्यापीठ कृती समितीचे रमेश कीर यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत कोकण विद्यापीठाचा प्रश्न लवकर सुटावा याकरीता आग्रह धरण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकणातील रत्नागिरीमधील ४५, सिंधुदुर्गामधील ३८ तसेच दक्षिण रायगडमधील २० अशी मिळून १०३ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत समितीने व्यक्त केले.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने अनेक प्रशासकीय कामात गोंधळ निर्माण होत असल्याचा दावा करण्यात येतो. पेपर फुटणे, निकालांना होणारा उशीर, प्राध्यापकांच्या नियुक्तीचा प्रश्न आदी विविध कारणांचा परिणाम कोकणातील महाविद्यालये आणि शैक्षणिक वातावरणावर होतो.
नवी दिल्ली - भविष्यात पाकव्याप्त काश्मीर देखील भारताचा भाग ....
अधिक वाचा