By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 11:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नागपूर शहराच्या कोव्हिड रुग्णालयातील बेड धनदांडग्यांनी अडवल्यामुळे गरजू रुग्णांना शहरात वेळेवर बेड मिळत नाहीत, अशी कबुली नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिली.
नागपूर शहरातील काही कोव्हिड रुग्णालयात धनाढ्य व्यक्तींनी बेड अडवून ठेवले आहेत. ‘मला काहीतरी होईल, या भीतीने काही जणांनी रुग्णालयात बेड अडवून ठेवले आहेत, ही बाब नागपूरच्या महापौरांनी मान्य केली.
नागपूर शहरात आतापर्यंत तीन हजार कोरोना योद्ध्यांना संसर्ग झाला आहे. यात मेयो, मेडिकलमधील आरोग्य कर्मचारी, नागपूर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळेच शिस्त पाळण्याचं आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केलं आहे.
महापौर काय म्हणाले?
“काही मंडळी आमच्यातील अशी आहेत. तब्येतीला काही झालेलं नाही, इम्युनिटी लेव्हलही चांगली आहे. परंतु मला काहीतरी होईल, या धाकाने रुग्णालयात बेड अडवून ठेवले आहेत. काही जण अजूनही या विचारात आहेत, की मला काहीच होणार नाही, म्हणून रोज सीताबर्डीवर गर्दी करतात, चहाच्या टपरीवर गर्दी करतात आणि घरी बसून सांगतात, की लॉकडाऊन केले पाहिजे” असा टोला संदीप जोशी यांनी लगावला.
“जीएमसीमध्ये सहाशे बेड्स असताना अडीचशे स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मेयोमध्ये 100 जण पॉझिटिव्ह आहेत. महापालिकेत दोनशेपर्यंत कर्मचारी कोरोनाग्रस्त आहेत. नेहरुनगर, लक्ष्मीनगर अशा वेगवेगळ्या झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे नागपूरमध्ये एकाच वेळी सर्व यंत्रणा मोडकळीस येण्याची स्थिती आहे” अशी भीती महापौरांनी व्यक्त केली.
“लॉकडाऊन लागेल, ना लागेल हा वेगळा विषय, पण जनतेने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. भाजी आणायला नवरा-बायकोने एकत्र जाण्याची आवश्यकता आहे का, बाहेर चहा प्यायलाच पाहिजे का, पाटवडी खाल्लीच पाहिजे का, हे ठरवा. महापालिकेच्या वेबसाईटवर डॉक्टरांच्या नंबरची यादी दिली आहे, तिचा लाभ घ्या” असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
नागपुरात कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. खाजगी कोव्हिड रुग्णालयात बेड मिळत नसल्याने शहरात आतापर्यंत अनेक कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर अशा रुग्णालयांवर कारवाई कधी होणार? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा डोकं वर ....
अधिक वाचा