By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 02, 2020 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
नाशिकचे डॅशिंग ट्रॅफिक एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर वायरलेसच्या माध्यमातून त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कडक शिस्तीचे अधिकारी अशी ख्याती असलेल्या मंगलसिंग सूर्यवंशी यांचे हळवे रुप यावेळी पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगलसिंग सूर्यवंशी यांनी सेवानिवृत्तीनंतर वायरलेसवरुन सहकाऱ्यांचा निरोप घेतला. हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
“नियत वयोमानानुसार मी सेवानिवृत्त होत आहे. माझा चार्ज मी दीपाली खन्ना यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यापुढे वायरलेसवरुन माझा आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही, मला कायदेशीर बोलता येणार नाही. पण मी एखाद्या सहकाऱ्याकडे गेलो, तर मी तुम्हाला ऐकू शकेन. एका मिनिटानंतर माझा वाढदिवस आहे. तुम्ही दिलेल्या वाढदिवस आणि सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा मी स्वीकारतो” असे बोलताना सूर्यवंशी गदगदले.
“माझ्या वागण्या-बोलण्यातून कोणाला त्रास-वेदना झाल्या असतील, तर माफ करा, परंतु माझाा स्वभाव आणि कामाची पद्धत तशी आहे, असं समजून मोठ्या मनाने वाढदिवसाची भेट म्हणून मला माफ करावं” असंही सूर्यवंशी म्हणाले. भावी आयुष्य आरोग्यदायी व्हावं आणि कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी वायरलेसवरुन काही सहकाऱ्यांनी सुर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या.
मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या विभाग दोनची जबाबदारी नव्याने बदली होऊन आलेल्या सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे देण्यात आली आहे. वाहतूक शाखेची जबाबदारी नव्याने बदलून आलेले सीताराम गायकवाड यांच्याकडे देण्यात आली आहे.
नाशिकचे डॅशिंग पोलिस अधिकारी अशी मंगलसिंग सूर्यवंशी यांची ओळख आहे. नाशिकमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकींमध्ये मंगलसिंग सूर्यवंशीही सहभागी झाल्याचे व्हिडीओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
कोरोना विषाणूचे संकट आणि लॉकडाऊननंतर महाराष्ट्र सरकारने आता राज्यात गुंत....
अधिक वाचा