By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी... ऑनलाईन शॉपिंगची सवय ही आता आजाराचं स्वरुप घेऊ लागलीय. २०२४ पर्यंत ऑनलाईन शॉपिंगच्या व्यसनाला आजाराचा दर्जा देण्याची तयारी जागतिक आरोग्य संघटनेनं केलीय. तुम्ही दहा ते बारा वर्षांपूर्वीचं तुमच्या आयुष्याबाबत आठवून पाहा... तुम्हाला त्यावेळचा साधेपणा लक्षात येईल. मोबाईलशिवाय आयुष्य मस्तपैकी चाललं होतं. तुम्ही खरेदीसाठी कुटुंबासह नटून थटून बाजारात निघत होता. तेव्हा दुकानं आणि दुकानदारांमध्येही तो उत्साह होता. सेलचे लागलेले मोठे मोठे बोर्ड तुमचं लक्ष वेधून घ्यायचे. कुटुंबकबिला दुकानात गेल्यावर तिथं खरेदी करताना घासाघिस चालायची. या लाईफस्टाईलची आजच्या आयुष्याशी तुलना करा बरं?
मानसिक आरोग्य धोक्यात
सध्या कंप्युटर आणि मोबाईवरुन खरेदी सोपी झालीय. फक्त क्लिक करा आणि सामान तुमच्या घरी येतं. ऑनलाईन शॉपिंग करताना हप्त्याचा पर्याय देण्यात आलाय. त्यामुळं ऑनलाईन शॉपिंगचा बाजार वेगानं वाढतोय. पण याच वेगानं ऑनलाईन शॉपिंगचा आजारही वाढतोय.
लोकांना ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन लागलंय. हे असं व्यसन आहे ज्यानं लोकांचं मानसिक आरोग्यही बिघडलंय. जर्मनीच्या हॅनवोर मेडिकल स्कूलच्या एका अहवालानुसार लोकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन वाढलंय.
'बाईंग शॉपिंग डिसॉर्डर'
काही खरेदी करायची नसली तरी लोकं ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर टाईमपास करतात. जवळपास ३४ टक्के लोकांमध्ये शॉपिंगच्या व्यसनाची लक्षणं आढळली आहेत. या सवयीला 'बाईंग शॉपिंग डिसॉर्डर' असं नाव देण्यात आलंय.
या व्यसनामुळं लोकांच्या वागणुकीतही बदल होतो. लोकांना गरज नसताना ऑनलाईन शॉपिंग करावीशी वाटते आणि शॉपिंगची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकं कोणत्याही पातळीवर जायला तयार असतात. ज्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पडलेला दिसतो.
आर्थिक ताण
ऑनलाईन शॉपिंगचं हे प्रकरण एवढं गंभीर आहे की २०२४ पर्यंत जागतिक आरोग्य संघटना खरेदीच्या व्यसनाला आजाराचा दर्जा देऊ शकते. सर्व्हेक्षण संस्था गार्टनरच्या दाव्यानुसार वाढती ऑनलाईन शॉपिंग मानसिक आजाराचं स्वरुप घेऊ शकते. कारण लोकं ऑनलाईन शॉपिंग करताना आपलं उत्पन्न किती आहे, हे विसरुन जातात. शिवाय गरजेपेक्षा जास्त खरेदी करु लागतात. त्यामुळं माणूस आर्थिक संकटात सापडू शकतो... आणि त्यामुळं मानसिक तणावही वाढू शकतो.
त्यामुळे आतापासूनच विचार करा. तुम्ही जी वस्तू खरेदी करताय ती वस्तू खरंच गरजेची आहे का? तुम्हाला विनाकारण शॉपिंग करण्याची सवय लागली नाही ना हे जाणून घ्या... विनाकारण तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करावीशी वाटत असेल तर हे चिंताजनक आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्याच दिवशी गृहमंत्री अमित शाहा यांनी मोठी ....
अधिक वाचा