By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर त्याचा जो तपास सुरु झाला त्यावेळी मुंबई पोलिसांच्या कामकाजवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. मुंबई पोलीस कसे वेगळा अजेंडा राबवत आहेत, त्यांना कशा पद्धतीने काही लोकांना लपवायचं आहे अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. केवळ मुंबई पोलीसच नव्हे तर राज्य सरकारलाही याची धग जाणवली. आता एकीकडे एम्सच्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केल्याचं सिद्ध होत असतानाच मुंबई पोलिसांनीही जरा कंबर कसली आहे.
राज्य सरकार असो किंवा मुंबई पोलीस असो सोशल मीडियावर या दोघांविरोधात बराच मजकूर लिहिला गेला. मुंबई सायबर सेल अशा अनेक अकाऊंट्सची तपासणी करताना दिसू लागलं आहे. सायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल 80 हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती. एरव्ही मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीने जगात लौकिक मिळवला आहे. पण सुशातच्या मृत्यूनंतर लगेचच 14 जूनपासून ही अकाऊंट्स उघडली गेली असं अहवाल सांगतो.
ही 80 हजार अकाऊंट्स भारतातून न उघडता परदेशातून उघडण्यावर भर दिला गेला. यात तुर्की, इंडोनेशिया, जपान, थायलंड आदी देशांचा समावेश होतो. सायबर सेल आता या अकाऊंट्सचाही तपास करत आहे. केवळ राज्य सरकारची बदनामी करणे, मुंबई पोलिसांबद्दल अपप्रचार करणे हे दोन उद्देश समोर ठेवूनच ही अकाउंट्स काम करत असल्याचं यात म्हटलं आहे. यातून जे हॅशटॅग ट्रेण्ड झाले ते केवळ सुशांतच्या मृत्यूशी संबंधित असेच होते असं कळतं.
मुंबई पोलिसांनी यावर अधिकृत काहीच भाष्य केलेलं नाही. पण सायबरमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सर्व अकाऊंट्सची पाळंमुळं खणून काढतानाच, कुणाच्या सांगण्यावरुन हे सगळं झालं आहे याचाही तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने होत असल्याचं त्याने सांगितलं. सोमवारी मुंबई पोलिस आयुक्तांनीही पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलीस नेटाने काम करत असल्याचं सांगितलं होतं. शिवाय, सोशल मीडियावर अपप्रचार करणारी काही अकाऊंट्स आणि काही माध्यम संस्था यांच्यावरही मुंबई पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत असे संकेत त्यांनी दिले होते. ही पत्रकार परिषद होतानाच सायबर सेलने आपला असा 80 हजार बनावट अकाऊंट्सचा अहवाल देणं याने आता नवी कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीचा सामना करत असताना आता पृथ्वीवर आणखी ए....
अधिक वाचा