By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी MPSC आणि राज्यसेवा परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आंदोलनाच्या तयारीत होते. पण काल रात्रीच आबा पाटील आणि काही कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे काल संध्याकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्याच दरम्यान कोल्हापूरच्या मराठा कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस तैनात केले गेले आहेत. मातोश्रीवरील आंदोलनापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पहाटे 4 वाजता ताब्यात घेऊन त्यांना पुण्यात सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ठरल्याप्रमाणे 11 ऑक्टोबरलाच होणार असून, राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आयोगानं 16 सप्टेंबरला सरकारला विचारणा केल्यानंतर परीक्षेचे नियोजन केले असल्याचं सांगितलं आहे. आरक्षणाच्या निर्णयानंतर आणि कोरोनावरची लस उपलब्ध झाल्यानंतरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घ्यावी, अशी मागणीही केली जात आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या 6 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका बाहेर येत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, 6 ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला होता.
10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद
मराठा आंदोलकांनी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. हा बंद शांततेत करण्यात येईल. कुणीही त्या दिवशी खळखट्ट्याक करू नये, दगडफेक करू नये, असं आवाहन मराठा आरक्षण संघर्ष समितीने केलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. बंद दरम्यान काही महामार्ग अडवले जातील. रास्तारोको केला जाईल. पण बंदला हिंसक वळण लागलं तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असंही ते म्हणाले होते.
आम्ही राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे करत आहोत. तरुणांच्या भावना जाणून घेत आहोत. काल एका तरुणाने बीडमध्ये आत्महत्या केली. केवळ आरक्षण नसल्याने यशस्वी होऊ शकत नसल्याने त्याने हे पाऊल उचलले. त्यामुळेच आम्ही मराठा तरुणांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी हा बंद पुकारला आहे, असं संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी सांगितलं.
लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांच्या संसाराची सेटिं....
अधिक वाचा