By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2020 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रजा फाऊंडेशनकडून मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचं चालू कार्यकाळातील ‘प्रगती पुस्तक’ प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत नगरसेवकांच्या कामगिरीचा आलेख 60.2 टक्क्यांवरुन यंदा 55.7 टक्क्यांवर घसरल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रजा फाऊंडेशनच्या वार्षिक प्रगती पुस्तकात यंदा शिवसेना नगरसेवकांचा क्रमांक घसरल्याचं चित्र दिसून येतंय. पहिल्या 10 नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या फक्त दोनच नगरसेवकांचा समावेश झाला आहे.
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात पक्षीय कामगिरीचा विचार केला तर काँग्रेसनं पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांवर भाजप आहे तर शिवसेनेचा क्रमांक तिसरा आहे. या अहवालानुसार भाजपचे नगरसेवक हरिश छेडा यांनी 82.7 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या नेहल शाह आहेत. त्यांना 80 टक्के गुण देण्यात आले आहेत. तर शिवसेनेचे अनंतर हे 79.9 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
नगरसेवकांना त्यांची नियमित कामं, सभागृहातील जबाबदाऱ्यांपेक्षा निवडणूक प्रचाराला प्राधान्य द्यावं लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा आलेख उतरता राहिल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोना काळातील मदतकार्यात नगरसेवक आघाडीवर राहिले आहेत. शहरी नियोजनात नगरसेवकांची भूमिका महत्वाची राहिल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
नगरसेवकांच्या प्रश्नांच्या दर्जाचा प्रजा फाऊंडेशनकडून आढावा
नगरसेवक किती आणि कोणत्या दर्जाचे प्रश्न विचारतात याचाही आढावा या वेळच्या अहवालात घेण्यात आला आहे. या अहलावानुसार सभागृहात प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी झाल्याचं दिसून येत आहे. तसेच जनतेशी संबंधित प्रश्न विचारण्याचे प्रमाणही घटलं असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मलनि:सारण, कचरा, पाणी, रस्ते, पावसाचे पाणी तुंबणे अशा विषयांवरच्या जेवढ्या तक्रारी असतात त्या तुलनेत विचारलेल्या प्रश्नांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आत असल्याचं अहवालातून दिसून येत आहे.
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालाला आधार काय?
प्रजा फाऊंडेशन हे प्रगतीपुस्तक मांडताना नगरसेवकांचे शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारी, न्यायालयातील याचिका, सभागृहातील हजेरी, सभेमध्ये उपस्थित केलेले प्रश्न, नगरसेवक निधीचा केलेला वापर या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, असं या संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडीजवळील कोंडाईबारी घाटा....
अधिक वाचा