By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2020 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
राजधानी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलनाला बसले आहे. गेल्या 5 दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारनं या आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. पण शेतकऱ्यांकडून त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे. देव दीपावली निमित्त पंतप्रधान मोदी आज वाराणसीमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी केंद्रानं पारित केलेल्या कृषी कायद्याचं समर्थन केलं.
शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा उल्लेख
एखाद्या क्षेत्रात आधुनिकतेवर भर दिला जातो, तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. गेल्या काही वर्षात तसा प्रयत्न झाला आहे. गावखेड्यांमध्ये चांगल्या रस्त्यांसोबतच धान्य साठवणुकीची व्यवस्था, कोल्ड स्टोरेज उभारले गेले पाहिजेत. यासाठी 1 लाख कोटी रुपयाच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच किसान रेल्वे सुरु करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत. मोठ्या शहरांपर्यंत त्यांना पोहोचता येत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात सकारात्मक वाढ होताना दिसत आहे, असं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
केंद्राच्या कृषी कायद्याचं समर्थन करताना मोदी यांनी त्याबद्दल माहितीही दिली. नव्या कृषी कायद्यांमध्ये पर्याय देण्यात आले आहे. आधी आडतीच्या बाहेर होणारा व्यवहार बेकायदेशीर मानला जात होता. यावरुन अनेक छोट्या शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत होतं. कारण, ते आडतीपर्यंतही पोहोचू शकत नव्हते. मात्र आता छोट्या शेतकऱ्यांसाठी पर्याय देण्यात आला आहे. अशास्थितीतही कुणाला जुन्या पद्धतीनेच व्यापार योग्य वाटत असेल, तर तो पर्याय कुठे बंद केला गेलाय? असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला आहे.
‘विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’
कृषी कायद्यांतील बदलांचा निर्णय तर योग्य आहे, पण त्यामुळे पुढे जाऊन परिणाम भोगावे लागतील, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण केली जात असल्याचा आरोप मोदी यांनी विरोधकांवर केला. जे आतापर्यंत झालं नाही. जे कधी होणार नाही, त्यावरुन समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचं मोदी म्हणाले. नव्या कृषी कायद्याबाबतही हेच घडत आहे आणि हे तेच लोक आहेत ज्यांनी अनेक दशक शेतकऱ्यांचा छळ केला, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता केली. नव्या कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना नवे पर्याय आणि कायद्याचं संरक्षण देण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.
काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांची फसवणूक- मोदी
शेतकऱ्यांच्या नावानं अनेक योजनांची घोषणा केली जायची. पण ते स्वत: मान्य करत होते की योजना 1 रुपयाची असेल तर फक्त 15 पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होते, अशी टीकाही मोदींनी काँग्रेसवर केलीय. काँग्रेस सरकारच्या काळात किमान आधारभूत किमतीची घोषणा तर केली जायची पण त्यानुसार फार कमी खरेदी केली जात होती. त्यांच्या काळात MSP आणि कर्जमाफीवरुनही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोपही मोदींनी केलाय.
‘आमचं वचन कागदावर नाही, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात’
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार एकूण खर्चाच्या दीड पट MSP देण्याचं वचन आम्ही दिलं होतं. हे वचन आम्ही फक्त कागदावर ठेवलं नाही तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यापर्यंत ते पोहोचवलं, असा दावा त्यांनी केला. हे तेच लोक आहेत, जे पीएम किसान सन्मान निधीबाबत प्रश्न उपस्थित करत होते. ते अफवा परसत होते की निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करण्यात आली आहे. पण आज शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेतून चार पैसे जात आहेत, असंही मोदी म्हणाले. आतापर्यंत एक लाख कोरी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा....
अधिक वाचा