By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 09:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस युवकाच्या अंगलट आले आहे. रायगडमध्ये जानसई नदीत उडी मारणारा 23 वर्षीय युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. दक्षिण रायगड भागातील सर्व प्रमुख नद्यांना पूर आला आहे. म्हसळा शहरातून पाभरे भागात जाणाऱ्या मार्गावर जानसई नदीच्या पुलावर अनेक ग्रामस्थ नदीच्या पुराचा अंदाज घेत होते. पूर आलेल्या नदीमध्ये पोहण्याचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांचे मनोरंजन करण्याची लहर काही युवकांना आली.
जानसई नदी धोक्याच्या पातळीवर असूनही चार-पाच तरुणांनी पुलावरुन उड्या मारल्या. नदीत उड्या मारुन काही जणांनी लागलीच नदीचे तीर गाठले, मात्र 23 वर्षांच्या बदर अब्दल्ला हळदे या युवकाला नदीचा काठ गाठणे अशक्य झाले.
नदीच्या मध्यभागी असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहातून तिरावर येण्याचा प्रयत्न बदर करत होता. मात्र वाहत्या प्रवाहातून किनारा गाठणे त्याला अशक्य झाले. अखेर पुलावर जमलेल्या ग्रामस्थांसमोरच बदर वाहून जाऊ लागला.
बदर प्रवाहाच्या मध्यभागी दिसेनासा झाल्यावर ग्रामस्थांची तारांबळ उडाली. परंतु पूर आलेल्या नदीच्या पाण्यात उडी मारण्याचे धाडस कोणाला झाले नाही. पाण्यात उडी मारण्याआधी त्याने आपल्या चपलाही पुलावर काढून ठेवल्या होत्या.
ग्रामस्थांनी तातडीने म्हसळा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या साथीने शोधकार्य हाती घेतले, परंतु दिवसअखेरपर्यंत बदरचा शोध लागला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर संकटच कोसळले आहे.
ग्रामीण भागात पावसाळ्यात भरलेल्या विहीरी, तलाव, पूर आलेल्या नदीत उड्या मारण्याचे अचाट साहस अनेक युवक करत असतात. मात्र हे नसते धाडस आपल्याच अंगलट येणार हे समजण्याची वेळ निघून गेलेली असते.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम ....
अधिक वाचा