By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असंख्य चाकरमानी खास बाप्पासाठी विविध सामानांची वस्तूंची खरेदी करून कोकणाकडे रवाना होऊ लागले आहे. मिळेल ते वाहन पकडण्यासाठी कित्येकांची धडपड सुरू आहे. आगवू आरक्षण ज्यांनी केले ते निर्धास्त आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आणि रेल्वे प्रशासनाने कोकणात जाणार्या गणेश भक्तांसाठी विविध मार्गावरून स्थानकावरून खास गाड्या सोडणार आहे. असे असले तरी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा, यासाठी या मार्गावर गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय काही पर्यायी मार्गही सुचविले आहेत. ते मार्ग कोणते ते पाहूया.
रायगडातील गणेशभक्तांसाठी
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्या भक्तांची वाहतूक कोंडीत मोठीच कुचंबणा होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणार्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा मार्गावरील कळंबोली-पळस्पे फाटा (NH 48) येथून जाणार्या वाहनांनी कळंबोळी पनवेल बायपास-डी पॉइंट करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा या मार्गाचा वापर करावा. तसेच कळंबोली वाकण मार्गावरून जाणार्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे खोपोली-पाली-वाकण या मार्गाचा वापर करावा.
चिपळूण कडे जाण्यासाठी
यावर्षीही रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागासाठी गणेशोत्सवादरम्यान जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय खाजगी वाहनांनी जाणार्यांची संख्याही अधिक असते. परिणामी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच चिपळूनकडे जाणार्या वाहनांनी मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोळी-चिपळूण मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (NH 4) सातारा-उंब्रज-पाटण-कोयनानगर-कुंभार्ली घाट-खेर्डी-चिपळूण या मार्गाचा वापर करावा.
हातखंबा- रत्नागिरीसाठी
त्याचप्रमाणे कळंबोळी-हातखंबा-रत्नागिरी मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (NH 4) सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडून वळण घेवून मलकापुर-शाहुवाडी-अंबाघाट-साखरपा-देवरुख-हातखंबा या रस्त्याने जावे. तर राजापूरकडे जाणार्यानी कळंबोळी-राजापूर मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेवून मलकापुर-शाहुवाडी-आंबाघाट-लांजा-राजापूर या मार्गाने जावे. तर कळंबोळी-कणकवली या रस्त्याऐवजी मुंबई- पुणे एक्सप्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे-गगनबावडा घाट-वैभववाडी-कणकवली या रस्त्याचा वापर करावा. त्याशिवाय सावंतवाडीला जाणार्या वाहनांनी कळंबोळी-सावंतवाडी ऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गे सातारा- कराड- कोल्हापूर-निपाणी-आजारा-आंबोळी घाट-सावंतवाडी या मार्गाचा वापर करावा.
मदतीसाठी संपर्क
महामार्गावर प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास मदतीसाठी महामार्ग पोलिसांची वेबसाइट www.highwaypolice.maharashtra.gov.in ला संपर्क साधावा. तसेच 9833498334 व 9867598675 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलिस विभागाने केले आहे.
पाटणा उच्च न्यायालयाचे प्रशासनच भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्यांना संरक्षण ....
अधिक वाचा