By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2020 11:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
एशियन पेंटच्या एका जाहिरावरुन कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील आक्रमक झाले आहेत . त्यांनी थेट एशियन पेंटला फटकारलं असून त्यांच्याकडे माफी मागण्याची मागणी केलीय. या जाहिरातीत कोल्हापूरला चुकीच्या पद्धतीने दाखवून अपमान केल्याचा आरोप आमदार ऋतुराज पाटील यांनी केला आहे. तसेच एशियन पेंटने तात्काळ ही जाहिरात मागे घेऊन कोल्हापूरकरांची माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी इतर टीव्ही चॅनलला देखील ही जाहिरात न दाखवण्याची विनंती केली.
ऋतुराज पाटील म्हणाले, “प्रत्येक शहराला त्याची स्वतःची एक पंरपरा, मूल्ये आणि आगळीवेगळी ओळख असते. एशियन पेंटने आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी कोल्हापूर या महान शहराची सिंगापूरशी तुलना करत अपमान केला आहे. आम्ही या लज्जास्पद कृतीचा तीव्र निषेध करतो.”
“जगभरात आपल्या कामाने एका उंचीवर गेलेल्या अनेक यशस्वी लोकांची मुळं कोल्हापूरमध्ये आहेत. एशियन पेंटने आपल्या जाहिरातीत ज्या प्रकारे कोल्हापूरचं अवमूल्यन केलं ते कधीही सहन केलं जाणार नाही. एशियन पेंटने तातडीने ही जाहिरात मागे घ्यावी आणि कोल्हापूरच्या नागरिकांची माफी मागावी. सर्व टीव्ही चॅनल्सने ही जाहिरात प्रदर्शित करु नये अशी विनंती,” असं ऋतुराज पाटील म्हणाले.
Every city carries its own traditional value and unique identity. We strongly condemn this shameful act by @asianpaints which has insulted our Great Kolhapur City by comparing it with a foreign city, to promote their commercial product.https://t.co/i1JwEyhNJX
— Ruturaj S. Patil (@ruturajdyp) August 25, 2020
एशियन पेंटच्या या जाहिरातीत रंगाची जाहिरात करताना कोल्हापूर आणि सिंगापूरची तुलना करण्यात आली आहे. यात शाळकरी मुलं घराच्या रंगाचं कौतुक करताना दिसत आहेत. घराचा रंग मुलांना इतका आवडतो की ते ज्या मित्राचं घर आहे त्या मित्राला आता तू सुट्टीत विदेशात जाणार ना? असं विचारतात. त्यावर तो सिंगापूरला जाणार अशी बढाई मारताना दाखवण्यात आलंय. तितक्यात मुलाचे वडील घरात येऊन कोल्हापूरची तिकिटं मिळाली असून सुट्टीत कोल्हापूरला जाणार असल्याचं सांगतात. यावर सर्व मुलं बढाई मारणाऱ्या मित्रावर हसतात.
सिंगापूर ऐवजी कोल्हापूरला जाणं अपमानास्पद किंवा चेष्टेचं दाखवल्याचा मुद्दा पकडूनच ऋतुराज यांनी एशियन पेंटला फैलावर घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणी कोल्हापूरमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता ऋतुराज पाटील यांच्या या मागणीवर एशियन पेंट काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चीननं युद्धाचं रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ....
अधिक वाचा