By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - राज्यात सत्तेचं बळ मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत यशाचा आलेख उंचावणाऱ्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.
मानखुर्द येथील प्रभाक क्रमांक १४१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे व विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विठ्ठल लोकरे यांनी पालिका पोटनिवडणुकीत मात्र पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. विठ्ठल लोकरे यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार बबलू पांचाळ यांचा १ हजार ३८५ मतांनी पराभव केला. लोकरे यांना ४ हजार ४२७ तर पांचाळ यांना ३ हजार ४२ मते मिळाली.
काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने या प्रभागात पोटनिवडणूक झाली. शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह एकूण १८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. एकूण १८ हजार ५४ पुरुष आणि १४ हजार ३२ महिला मतदार असे एकूण ३२ हजार ८६ मतदार या प्रभागात असून त्यापैकी १३,४७६ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये, ७३४४ पुरुष मतदार आणि ६१३२ महिला मतदारांचा समावेश होता. आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात अवघ्या एका तासातच निकाल हाती आला.
मानखुर्दची निवडणूक विठ्ठल लोकरे व बबलू पांचाळ या प्रमुख उमेदवारांमध्ये झाली असली, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे खासदार मनोज कोटक आणि सेनेचे खासदार राहुल शेवाळे असादेखील सामना होता. कोटक यांनी रणनीती तयार करत पांचाळ यांना निवडून आणून शिवसेनेला आणि पर्यायाने शेवाळे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवाळे यांनी भाजपची खेळी टिकू दिली नाही. लोकरे यांच्या दणदणीत विजयाने शेवाळे यांचे या भागातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
नवी दिल्ली - काश्मीरमध्ये इंटरनेटवर पूर्णपणे बंदी आणणं जाचक असून....
अधिक वाचा