By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2021 09:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात विरोधकांच्या टीकेचा जोर वाढल्यानंतर आता राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) हे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या गुरुवारी पोहरादेवी येथे ते आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील, असे सांगितले जात आहे. मात्र, यावरुन शिवसेनेतील नेत्यांमध्येच दोन गट पडले आहेत. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Shivsena MLA Sanjay Rathod may resign from cabinet minister post)
पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल आणि व्यवस्थित चौकशी होऊन सत्य लोकांसमोर येईल. त्यानंतर गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांची ही भूमिका म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे. त्यामुळे शिवसेनेवर संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा का घ्यावा?
शिवसेनेतील एक गट संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, या मताचा आहे. नैतिकतेचा भाग म्हणून संजय राठोड यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर आल्यापासून संजय राठोड एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते नॉट रिचेबल आहेत. या सगळ्याचा फटका शिवसेनेच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला संजय राठोड यांनी राजीनामा देणे योग्य ठरेल, असे शिवसेनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा का देऊ नये?
गेल्या काही दिवसांत पूजा चव्हाण प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. त्यामध्ये पूजाने कर्जाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावरही अशाप्रकारचे आरोप झाले होते. मात्र, तेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. मग संजय राठोड यांच्याबाबतीतच नैतिकतेचा आग्रह का धरायचा, असे शिवसेनेतील दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.
संजय राठोड हा विदर्भातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा आणि तळागाळातून वर आलेला नेता आहे. बंजारा समाजाचे नेते आणि धर्मगुरुंनीही संजय राठोड यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे तुर्तास संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असे शिवसेनेतील दुसऱ्या गटाचे मत आहे.
संजय राठोड प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता
वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
देशातल्या चार सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्य़ा आहेत....
अधिक वाचा