By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 20, 2020 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप उद्या सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे (ShivSena leader Balasaheb Sanap joined bjp tomorrow)
बाळासाहेब सानप उद्या दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा पुन्हा ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदाच होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे. सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपमधील ही लॉबी सक्रिय झाली असून त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून आपला विरोध दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, थेट प्रदेश पातळीवरूनच सानप यांना पक्षप्रवेशाच्या पायघड्या घालण्यात आल्याने भाजप नाशिकमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
सानप का हवेत?
सानप हे पंचवटी परिसरात राहतात. या भागाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं असून पंचवटीत त्यांचा दबदबा आहे. या परिसरातून 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप पक्षात आल्यास किमान 15 नगरसेवक सहज निवडून आणणे सोपे होईल, असा प्रत्येक पक्षाचा अंदाज आहे. त्यामुळे सानप यांना पुन्हा पक्षात घेण्यास भाजपने हिरवा कंदिल दाखवला आहे. शिवाय राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने हे तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. त्याशिवाय नाशिकमध्ये मनसेची मोठी व्होटबँक असल्याने भाजपसाठी ती सुद्धा एक मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळेच भाजपने सानप यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिवसेनेत असमाधानी?
दुसरीकडे सानप यांना पक्षात ठेवण्यासाठी शिवसेनेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पक्षात संघटनात्मक जबाबदारी देण्याबरोबरच महामंडळाचे आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, या आश्वासनावर सानप अजूनही समाधानी नसल्याचं सांगण्यात येतं. विधानसभा निवडणुकीनंतर सानप अडगळीत गेले होते. आता पालिका निवडणुका आल्याने आपल्याला महत्त्व दिलं जात असून निवडणुका गेल्यावर पुन्हा जैसे थे परिस्थितीला सामोरे जावं लागणार असल्याचं सानप ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, सानप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सानप काय राजकीय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विविधतेनं नटलेला अशीच आपल्या भारताची ओळख आहे. इथं प्रत्येक धर्म, प्रत्येक स....
अधिक वाचा