ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'हम करे सो कायदा' चालणार नाही, पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झुकवले; शिवसेनेचा हल्लाबोल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2020 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'हम करे सो कायदा' चालणार नाही, पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झुकवले; शिवसेनेचा हल्लाबोल

शहर : मुंबई

केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांना (Agricultural law) विरोध करत पंजाबच्या शेतकऱ्यांनी (Punjab Farmers) केंद्र सरकारविरोधात गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु केले आहे. मागील आठवड्याभरापासून हे शेतकरी राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता जगभरातून पाठिंबा मिळू लागल्याने सरकारची कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनावरुन शिवसेनेनेही (ShivSena) सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामनामधून आंदोलन जारी ठेवणाऱ्या शेतकऱ्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवसेनेने ‘सामनातील अग्रलेखात म्हटले आहे की, “आम्ही दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील एकजुटीचा वारंवार उल्लेख करतो. कारण एकजूट हेच मोठे यश आहे. महाराष्ट्रात या एकीचे दर्शन कधी होणार? संयुक्त महाराष्ट्र लढ्यात पंडित नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा फेकणारे चिंतामणराव देशमुख पुन्हा या मातीत निपजले नाहीत. महाराष्ट्रावर असे अनेक प्रसंग आले व गेले, पण पंजाबातील खेळाडू, कलावंतांप्रमाणे किती ‘मऱ्हाटी बुद्धिजीवी महाराष्ट्राच्या प्रश्नी एकजुटीने उभे राहिले? आज पंजाबच्या शेतकरी एकजुटीची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुख पंजाब शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मतप्रदर्शन करीत आहेत. याप्रकरणी मोदी सरकारची कोंडी झाल्याचा आनंद आम्हाला नाही, पण शेतकऱ्यांचे आता तरी ऐका इतकेच मागणे आहे! आज पंजाब खवळलाय, उद्या संपूर्ण देश पेटला तर काय होईल?”

कडाक्याच्या थंडीतही पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घाम फोडला आहे. आंदोलन मागे घ्यायचे सोडाच, पण ते अधिक जहाल आणि तीव्र होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याच्या मोहिमा राबवल्या गेल्या, पण त्या भाजपच्या ‘आयटी सेलवरच उलटल्या.

गेल्या सहा वर्षांत सुपरमॅन मोदी सरकारची अशी भयंकर कोंडी आणि फजिती कधीच झाली नव्हती. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्या एका हातात जादूची छडी व दुसऱ्या हातात चाबूक आहे, ते कोणालाही झुकवू शकतात हा गैरसमज पंजाबच्या शेतकऱ्यांनी खोटा ठरवला आहे. बरं, इथे सरकारची नेहमीची हत्यारे म्हणजे सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी, अमली पदार्थविरोधी खात्याचे काहीच चालत नाही. उलट पंजाबच्या लाखो शेतकऱ्यांनीच मोदी सरकारला नोटीस पाठवून ‘‘मागे हटा नाहीतर खुर्च्या खाली करा’’ असा संदेश पाठवला आहे.

दिल्लीची कोंडी तर शेतकऱ्यांनी केलीच आहे, पण केंद्र सरकारला गुडघ्यावर आणले आहे. ‘हम करे सो कायदा चालणार नाही. मोदी सरकारचे तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मोदी सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले व कृषी कायदे कसे साखरेच्या पाकात घोळून बाहेर काढले आहेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवले, पण शेतकरी नेते सरकारचे चहा-पाणी न पिता बैठकीतून निघून गेले. मोदी सरकारने अन्यायाची नोटाबंदी पचवून ढेकर दिला. जीएसटीने केलेला सत्यानाश पचवला. बेरोजगारी, महागाईवर हिंदू-मुसलमान झगडा, हिंदुस्थान- पाकिस्तानचा उपाय दिला. लॉकडाऊनने जेरीस आलेल्या जनतेला अयोध्येत राममंदिराचे तबक दिले, पण पंजाबच्या शेतकऱ्यांसमोर त्यांचे कोणतेही ‘लॉलीपॉप चालले नाही. हे यश पंजाबच्या एकीत आहे.

भाजपच्या सायबर फौजांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीत फूट पाडण्याचे इमानेइतबारे प्रयत्न केले. हरयाणा सीमेवर वृद्ध शेतकऱ्यांना पोलीस चोपत असल्याचे चित्र राहुल गांधी यांनी ट्विटरवर टाकताच भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी हे कसे खोटारडे आहेत व त्यांनी खोटेच चित्र टाकले असा कांगावा केला. ‘हिंदुस्थानातील सर्वात बदनाम विरोधी पक्षनेत्यांपैकी एक अशी राहुल गांधींची संभावना करताच ट्विटरने मालवीय यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली व शेतकऱ्यांना पोलीस मारत असल्याचा व्हिडीओच प्रसिद्ध केला. भाजपचा आयटी सेल त्यामुळे तोंडावर पडला. दुसरे प्रकरण मुंबईस पाकव्याप्त कश्मीर म्हणणाऱ्या भाजपच्या बेताल नटीचे. शेतकरी आंदोलनात भाग घेणाऱ्या एका वृद्ध ‘चाचीला या नटीने शंभर रुपये रोजावर काम करणारी शाहीन बागवाली ‘आण्टी ठरवले. हे प्रकरणसुद्धा खोटे ठरले व त्या बेताल नटीला माघार घ्यावी लागली. एवढंच नव्हे तर त्या वृद्ध आजींनी या नटीला सुनावलेदेखील. ‘‘आपली 100 एकर जमीन आहे आणि या नटीने माझ्या शेतात काम करावे. मी तिला 600 रुपये देते. तिने कापसाची एक गोणी उचलून दाखवावी,’’ अशा शब्दांत या आजींनी बेताल नटीला तिची जागा दाखवली. अशी अनेक प्रकरणे रोजच शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत घडत आहेत.

सरकारच्या व भाजप सायबर फौजांच्या हातचलाख्यांचा भंडाफोड होत आहे. ‘मोदी है तो मुमकीन है या घोषणेचा फज्जा उडताना दिसत आहे. अमित शहा यांनी वारंवार आंदोलकांना माघार घेण्याचे आवाहन केले. शेवटी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांना चर्चेतून तोडगा निघावा यासाठी दिल्लीत पाचारण करावे लागले. आम्ही दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील एकजुटीचा वारंवार उल्लेख करतो. कारण एकजूट हेच मोठे यश आहे. पंजाबातील सर्व गायक, कलावंत, खेळाडू यांनी त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार केंद्राला परत करायचे ठरवले आहे, परंतु भाजपवाले खिल्ली उडवतात तशी ही काही पुरस्कार वापसी गँग नाही. पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार परत करून ही मंडळी शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आहेत. आता तर अकाली दलाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनीही नवीन कृषी कायदे आणि शेतकऱ्यांवरील कारवाई यांचा निषेध म्हणून ‘पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. राष्ट्रपतींना तीन पानी पत्र लिहून त्यांनी त्यांच्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

आम्ही प्रकाशसिंग बादल यांच्यासह या सगळ्या कलावंत खेळाडूंचे अभिनंदन करीत आहोत. आमचा शेतकरीच जगला नाही तर हे पुरस्कार छातीवर मिरवून काय करायचे? शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीश्वर ऐकणार नसतील तर आम्हाला तुमचे पुरस्कार नकोत. धन्य ते कलावंत, धन्य ते खेळाडू! महाराष्ट्रात या एकीचे दर्शन कधी होणार? संयुक्त महाराष्ट्र लढ्यात पंडित नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा फेकणारे चिंतामणराव देशमुख पुन्हा या मातीत निपजले नाहीत. महाराष्ट्रावर असे अनेक प्रसंग आले व गेले, पण पंजाबातील खेळाडू, कलावंतांप्रमाणे किती ‘मऱ्हाटी बुद्धिजीवी महाराष्ट्राच्या प्रश्नी एकजुटीने उभे राहिले? अगदी कालचा त्या भाजपपुरस्कृत नटीचाच विषय घ्या. मुंबईस पाकिस्तान म्हणेपर्यंत मजल गेली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन लुडबूड करतात, पण पुरस्कार वगैरे परत करायचे ठेवा बाजूला, साधा निषेधाचा सूरदेखील कोणी काढला नाही. म्हणायला काही मंडळींनी भूमिका घेतल्या, पण पंजाबसारखी एकजूट कोठेच दिसली नाही. आज पंजाबच्या शेतकरी एकजुटीची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुख पंजाब शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मतप्रदर्शन करीत आहेत. याप्रकरणी मोदी सरकारची कोंडी झाल्याचा आनंद आम्हाला नाही, पण शेतकऱ्यांचे आता तरी ऐका इतकेच मागणे आहे! आज पंजाब खवळलाय, उद्या संपूर्ण देश पेटला तर काय होईल?

मागे

तामिळनाडू, पुद्दुचेरीला पावसाने झोडपले, केरळ-तामिळनाडूतील 11 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर
तामिळनाडू, पुद्दुचेरीला पावसाने झोडपले, केरळ-तामिळनाडूतील 11 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर

निवार हे चक्रीवादळ (Nivar Cyclone) शांत होत नाही तोवर अजून एका मोठ्या चक्रीवादळाचा द....

अधिक वाचा

पुढे  

सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना शरद पवार आणि अजित पवार काय म्हणाले...
सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना शरद पवार आणि अजित पवार काय म्हणाले...

महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात....

Read more