By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वसुंधरेच्या संवर्धनासाठी अनेक संस्था मोठ्या जबाबदारीने पुढे येत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण त्यांच्या प्रत्येक कृतीतून या पृथ्वीचं संरक्षण कशा प्रकारे केलं जाईल याचाच विचार करत आहे. सतत बदलणारं ऋतूचक्र, सिमेंटच्या वस्त्यांचं वाढतं प्रमाण आणि या साऱ्याचा सृष्टीवर होणारा थेट परिणाम पाहता आता अनेक स्तरांवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची सुरुवात करण्यात आली आहे.सध्या असाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील Kodungallur महगानगरपालिकेने घेतला आहे.
सोशल मीडियावर या महानगरपालिकेच्या निर्णयाचं मोठ्या उत्साहात आणि सकारात्मकतेने स्वागत करण्यात आलं. या महापनगरपालिकेकडून करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार नवीन बांधकाम करण्यात आलेल्या इमारती किंवा घराच्या बांधकामापाशी किमान दोन वृक्षांची लागवड करणं अनिवार्य आहे.
पर्यावरण दिनाच्याच दिवशी या महानगरपालिकेकडून ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती. ‘Prevent Air Pollution’ या त्यांच्या उपक्रमाअंतर्गत हा नवा नियम लागू करण्यात आला. ज्यामध्ये १ हजार ५०० चौरस फुटांच्या प्रत्येक बांधकामासाठी किमान दोन वृक्ष लावण्याची गरज आहे. त्यानंतरच महानगरपालिकेकडून संबंधित घराच्या बांधणीच्या पूर्णत्वाचं प्रमाणपत्र आणि अधिकृत घर क्रमांक देण्यात येणार आहे. 'द न्यूज मिनिट'शी संवाद साधत Kodungallur महानगरपालिका अध्यक्ष के.आर. जैथरन यांनी या अनोख्या आणि तितक्याच पर्यावरणपूरक नियमाची माहिती दिली.
'स्थानिक संस्थांच्या परवानगीनंतर ज्यावेळी नागरिक घराच्या बांधणीसाठीची परवानगी मागण्यासाठी येतात तेव्हा त्यांनी बांधणीचा आराखडा सोबत आणणं महत्त्वाचं आहे. त्याचवेळी घराच्या कोणत्या भागात वृक्ष लागवड करणार यासाठीची जागाही निश्चित करण अनिवार्य आहे. दुसऱ्या टप्प्यात घराची बांधणी झाल्यानंतर महानगरपालिकेचे काही अधिकारी घर क्रमांक देण्यापूर्वी त्या जागेची आणि निर्धारित जागेत वृक्ष लागवड करण्यात आली आहे की याची पाहणी करतील', असं जैथरन म्हणाले.
कमी भूखंड असणाऱ्या घरांसाठीही या महानगरपालिकेकडून वेगळे नियम तयार करण्यात आलेल आहेत. ज्यामध्ये लहान वृक्षांची लागवड करण्यास सांगण्यात आलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा कुटुंबांना स्थानिक प्रशासनाकडून वृक्षलागवडीसाठीची रोपंही देण्यात येणार आहेत.
अध्यक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार Kodungallur क्षेत्रात जवळपास १ हजार १४० नव्या घरांची बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हा एक स्तुस्तय निर्णय ठरत असून याचं अनुकरण देशातील सर्व महानगरपालिकांनी करावं, अशीच मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
वायू चक्रीवादळामुळे रायगड किनारपट्टीवर देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला....
अधिक वाचा