By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 03, 2021 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा लाबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी यंदा परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा इयत्ता बारावीची परीक्षा ही 15 एप्रिलनंतर होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर दहावीची परीक्षा ही येत्या 1 मेनंतर होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी फेब्रुवारीत होणाऱ्या 12 वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत असल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा आयोजित केली जाते. दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीची परीक्षा घेतली जाते. तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात होते. मात्र कोरोना संसर्गामुळे यंदा शैक्षणिक वर्ष उशिराने सुरु झालं आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. हाच ताण कमी करण्यासाठी यंदा परीक्षा उशिराने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, याआधी राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षा गायकवाड यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती. दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.
या परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जातोय. मात्र कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ....
अधिक वाचा