By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 10:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
राज्यभरात अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच सत्तास्थापनेचा पेच तयार झाल्याने सरकारकडून तात्काळ उपाययोजना करण्यासही उशीर होत आहे. याचे गंभीर परिणाम पाहायला मिळत आहे. मदतीच्या अभावी खचलेल्या शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसत आहे. एकट्या विदर्भात 20 दिवसांमध्ये 29 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अवकाळी पावसामुळं खरिप पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान आहे. पावसात पिकं गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची मागणीही होत आहे. मात्र, सध्या तरी राज्यात धोरणात्मक निर्णयांना राष्ट्रपती राजवटीने खिळ बसली आहे. अशास्थितीत शेतकरी खचताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका विदर्भात बसल्याचं दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.याव्यतिरिक्त अमरावतीत 1, वाशिममध्ये 3, चंद्रपूरमध्ये 3, गडचिरोलीमध्ये 1 आणि गोंदिया जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे नागरिकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे मागील 20 दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा गोंधळ आणि राज्यावरील राष्ट्रपती राजवट यावरही नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, सध्या तरी हा गोंधळ संपण्याची चिन्ह नाही.दरम्यान, अवकाळी पावसाने उद्ध्वस्त शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी जोरदार आंदोलनही केले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही झाल्याचं दिसत नाही.
सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्ण....
अधिक वाचा