By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कुटुंबीयांकडून व्हिडिओ शेअरींग ऍप 'टीक-टॉक'पासून दूर राहण्यासाठी दटावणी करण्यात आल्यानंतर एका २४ वर्षीय महिलेनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात ही घटना घडलीय. अनिता असं या २४ वर्षीय महिलेचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, अनितानं कॅमेऱ्यासमोर कीटकनाशक प्राशन करून 'टीक-टॉक' ऍपद्वारे आपल्याच आत्महत्येचं चित्रणंही केलं.
अनिता (२४ वर्ष) आणि पलानिवेल (२९ वर्ष) या जोडप्याला ४ वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा अशी दोन अपत्य आहेत. पलानिवेल हा गेल्या काही वर्षांपासून कामानिमित्तानं सिंगापूरला राहत होता. या दरम्यान, अनिताला तिच्या काही मित्र-मैत्रिणींमुळे टीक-टॉक ऍपबद्दल माहिती मिळाली. यानंतर अनिताला या ऍपचं व्यसनचं जडलं, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करून अनिता जास्तीत जास्त वेळ टीक-टॉक ऍपवर व्यतीत करत असल्याची तक्रार तिचे कुटुंबीय सातत्यानं करत असत. कुटुंबीयांनी ही तक्रार अनिताच्या पतीकडेही केली. पतीनं अनिताला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचं हे व्यसन काही सुटलं नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खेळत असताना अनिता हिच्या मुलीला दुखापत झाली. यावेळीही कुटुंबीयांनी अनिता मुलीकडे लक्ष देण्याऐवजी टीक-टॉकवर व्यग्र असल्याची तक्रार तिच्या पतीकडे केली. यामुळे अनिता आणि तिच्या पतीमध्ये फोनवरच भांडण झालं... या दरम्यान पलानिवेल यानं अनिताला तिचा फोन नष्ट करण्याची धमकी दिली. यामुळे नैराश्यग्रस्त अवस्थेत अनितानं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.गंभीर अवस्थेत अनिताला पहिल्यांदा अरियालूर सरकारी रुग्णालयात आणि नंतर त्रिचीच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.
उल्लेखनीय म्हणजे, ३ एप्रिल २०१९ रोजी मद्रास हायकोर्टानं एका याचिकेवर निर्णय देताना केंद्र सरकारला टीक-टॉक ऍपवर बंदी आणण्याचे निर्देश दिले होते. परंतु, २४ एप्रिल रोजी मद्रास हायकोर्टानंच ही बंदी उठवण्याचे आदेश दिले.
वसुंधरेच्या संवर्धनासाठी अनेक संस्था मोठ्या जबाबदारीने पुढे येत आहेत. सर्....
अधिक वाचा