By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 16, 2020 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनामुळे प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिरही बंद ठेवण्य़ाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वैद्यकीय मदत कक्ष मात्र सुरू राहणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सिद्धिविनायक मंदिरात रोज हजारो लोकं दर्शनासाठी येत असतात. कोरोना आणखी पसरु नये म्हणून ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने देखील काही महत्त्वाचे निर्णय़ घेण्याची गरज आहे.
राज्यसरकारने सर्व देवस्थान संस्थांना विनंती केली आहे. सिद्धिविनायक मंदिरासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी इथलं दत्त मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच गणपतीपुळे मंदिरात ही उद्यापासून दर्शन बंद करण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. ज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्यावी. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहे त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असून ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितलं आहे अशा लोकांनी प्रभावीपणे याची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्राहकांच्या अडचणी 18 मार्च ....
अधिक वाचा