By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 20, 2024 01:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा आरक्षणाची लढाई आता निर्णायक स्थिती येऊन पोहचली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार महिन्यांपासून लढा तीव्र झालेला असतानाच, आता मराठा आरक्षणाची लढाई मुंबईत सुरु होणार असल्याचे चित्र आहे. घरी न राहता या आरपारच्या लढाईत उतरण्याचे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाचा मु्द्दा चांगलाच तापला आहे. काही वर्षांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मुंबईत महाविराट मोर्चा धडकला होता. अत्यंत शिस्तबद्ध अशा या मोर्चाने जगाचे लक्ष वेधले होते. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मराठे मुंबईकडे कूच करणार आहेत. ही आरपारची लढाई असल्याचा जरांगे यांनी जाहीर केले आहे. आता घरी न राहता 26 जानेवारी रोजी मुंबईत ताकदीनीशी येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावरुन जरांगे यांचा सरकारवर विश्वास उरला नाही का? असा सवाल करण्यात येत आहे, तर सरकारशी चर्चेची दारे सताड उघडी असल्याचा दावा पण जरांगे यांनी केला आहे.
आता मागे हटणार नाही
मराठा आरक्षणाबाबत सभा होत असताना, दुसरीकडे ओबीसी आक्रोश मोर्चाने राज्यात मोठे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध सुरु आहे. ओबीसी नेते पण मुंबईत आंदोलनासाठी मैदानाची मागणी करत आहेत. त्यातच 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय मागे न हटण्याची भूमिका जरांगे यांनी घेतल्याने सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. मराठा बांधवांनी ताकतीने मुंबईत दाखल होण्याचे आवाहन त्यांनी केले.
गल्लीगल्लीत मराठे दिसतील
मुंबईत दाखल होण्याची मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी अगोदरच केली होती. मुंबईत तीन कोटी मराठे येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर तीन लाख येतात की तीन कोटी येतात, हे दिसून येईल, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. त्यावर गल्लीगल्लीत मराठे दिसतील, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. मुंबईतील सर्वच मैदाने आम्हाला लागणार आहेत. 3 कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी सरकारची असल्याचे जरांगे म्हणाले होते.
तर नाव बदलून ठेवा
मुंबईत 3 कोटी मराठा बांधव येतील. पुण्याच्या पुढे गेले आणि पनवेलजवळ पाहिले आणि तीन कोटी पेक्षा कमी बांधव आले तर नाव बदलून ठेवा असा खणखणीत इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता. सरकारने आमची गुप्त आकडेवारी काढली आहे. त्यांचे गणित कोलमडल्याचा टोला पण त्यांनी लगावला होता. मुंबईत पोहचण्यासाठी मराठा आंदोलकांनी गावोगावी जाऊन अगोदरच आवाहन केले आहे. त्याला अनेक गावातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अनेक गावातून ट्रॅक्टरमध्येच सर्व सामान, साहित्य भरुन आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत.
सरकारसोबत चर्चेची दारे खुली
मुंबईकडे कूच करण्यापूर्वी सरकारसोबत चर्चेची दारे खुली असल्याचे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार प्रत्येक वेळी आंदोलनाच्या एक दोन दिवस अगोदर तात्पुरती कार्यवाही करते. मलमपट्टी लावते आणि समाजात संभ्रम निर्माण करते असा आरोप त्यांनी केला. आता मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 26 जानेवारीपासून मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत.
गावातीलच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी ते तिघे एक....
अधिक वाचा