By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2020 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनाकाळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी टीव्ही 9 च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.
संयत पण जिगरबाज पत्रकारिता करता करता पांडुरंग यांना कोरोनाने गाठलं. लढवय्या पांडुरंग यांनी कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार केला. मात्र ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्याने, पांडुरंग यांचा लढा अपुरा पडत गेला. पांडुरंग हे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दुर्दैव म्हणजे पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.
लढवय्या पांडुरंग यांच्यावर ही वेळ येत असेल, तर ही आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या चिंधड्या कशा पसरल्या आहेत, याकडे बोट दाखवणारी बाब आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री हे आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा कितीही दावा करत असले, तरी पुण्यात व्हेंटिलेटर न मिळणं आणि त्यापेक्षा अॅम्ब्युलन्सही उपलब्ध न होणं हे सरकारी दाव्याचा फोलपणा उघडा पाडतं.
पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्रा आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटातही अविरतपणे काम करुन बातम्या देणाऱ्या पांडुरंग यांचीच बातमी होते, हा विचारच काळीज पिळवटून जातो. या कठीण काळात पांडुरंग यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी टीव्ही 9 मराठी परिवार खंबीरपणे उभा आहे.
आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आल्याची घ....
अधिक वाचा