By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2020 09:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
ओपन एअर थिएटर्सही उघडण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच देशातील 10 राज्यांमध्ये योग्य ती काळजी घेऊन इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड या राज्यांत आजपासून 50 टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा अद्याप सुरू करण्यात येणार नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका वेळी शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावले जाऊ शकते. ज्या शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी लावण्याची पद्धत आहे, तेथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी इतरही काही व्यवस्था असणे आवश्यक आहे. जर शाळा विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करीत असेल तर दररोज नियमितपणे वाहनाची स्वच्छता करावी लागेल.
या अटीशर्थींसह शाळा सुरु होणार
फक्त 50 टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह शाळा सुरू होणार
पालकांच्या लेखी परवानगीने विद्यार्थी शाळेत येऊ शकतील
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व उपाय केले जातील, तसेच सर्व अटी शर्थींचं पालन करण्यात येईल
मास्क आणि सोशल डिस्टंन्सिग बंधनकारक असणार आहे
शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल
सध्या ज्या शाळा कन्टेन्मेट झोनमध्ये नाहीत त्याच सुरू होणार
कन्टेन्मेट झोनच्या बाहेर असणाऱ्या शाळांमध्येही फक्त त्याच विद्यार्थी आणि शिक्षकांना परवानगी देण्यात येणार जे कन्टेन्मेट झोनमध्ये राहत नाहीत.
शाळेत येणारे विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांनाही कन्टेन्मेट झोनमध्ये जाण्याची परवानगी नाही.
शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार, फक्त कन्टेन्मेट झोनमध्ये न येणाऱ्या शाळा आणि कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच कन्टेन्मेट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेत येण्याची परवानी नाही. तसेच वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला तसेच आजारी असलेल्या शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात येण्याची परवानगी नाही. तसेच शाळेत विद्यार्थ्यांनी पुस्तकं, वह्या आणि पेन्सिल यांसारख्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करू नये, याचीही काळजी शाळेतील व्यपस्थापकांना आणि शिक्षकांना घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रात 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे अवघड : शिक्षणमंत्री
राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करता येतील का? याबाबत शिक्षण विभाग आणि संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिलाय. म्हणून आता दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले होते. त्याबाबत एसओपी (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली. परंतु, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडलीय. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी केली. बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येण....
अधिक वाचा