By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 03:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकल सेवेअभावी वसई-विरार-नालासोपारा परिसरातील चाकरमान्यांचे हाल सुरु आहेत. लोकल बंद असल्याने सकाळी 8 वाजता कामावर पोहचण्यासाठी पहाटे 4 वाजल्यापासूनच बस पकडण्यासाठी बस आगारात रांगा लावाव्या लागत आहेत.
वसई-विरार परिसरातून बोरिवली, दादर, मुंबई सेंट्रल, मंत्रालयासाठी दिवसाला हजारो लोक कामानिमित्ताने प्रवास करतात. सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा नसल्याने बस प्रवासात होणाऱ्या आर्थिक, शारीरिक त्रासासोबतच वाहतूक कोंडीने चाकरमानी रोज हैराण होत आहेत. कोरोना महामारीपेक्षा बस प्रवासानेच रोज मरणयातना सहन कराव्या लागत असल्याच्या तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
नालासोपारा बस आगारात पहाटे 5 वाजल्यापासून बस पकडण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागतात. सकाळी 8 वाजता कामावर पोहचण्यासाठी 3 ते 4 वाजल्यापासूनच घरातून तयारी करुन प्रवाशांना बस आगार गाठावे लागते. एक ते दीड तास रांगेत थांबून बस पकडावी लागत आहे. तर यासाठी दिवसाला 300 ते 400 रुपये तिकिटासाठी खर्च करावे लागत आहेत.
बस पकडण्याच्या घाईत या प्रवाशांकडून सोशल डिस्टन्सचाही फज्जा उडतो. कोरोना महामारीची भीती दाखवून सरकार सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करत नाही. पण पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोनापेक्षा बस प्रवासात सामान्य माणूस रोजच मरण यातना सहन करत असल्याच्या तीव्र भावनाही ते व्यक्त करत आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसाठीसुद्धा शासनाने लोकल ट्रेन सुरु करावी, अशी मागणी या प्रवाशांमधून जोर धरत आहे. ज्याप्रमाणे सोशल डिस्टन्सचे भान ठेवून बस सोडल्या जातात, त्याचप्रमाणे कामाच्या वेळेत सोशल डिस्टन्स ठेवून लोकल ट्रेन सोडल्या तर सामान्य प्रवाशासाठी सोयीचे होईल.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगारकपात झाली आणि अशा वेळेस बससाठीचा तिकिटांचा आर्थिक भुर्दंड, वेळेचा अपव्यय यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या आधीसुद्धा चाकरमान्यांनी नालासोपारा, विरार रेल्वे स्थानकांमध्ये, रुळांवर उतरून आंदोलनेदेखील केली होती. परंतु सरकार यावर कोणताही ठोस निर्णय घेताना मात्र दिसत नाही.
नालासोपारा बस आगारातून बोरिवली, दादर, जे. जे. हॉस्पिटल, मंत्रालय या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास सव्वा दोनशे बस सोडल्या जातात. सर्वाधिक प्रवासी संख्या नालासोपाऱ्यात असल्याने, पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त बस याठिकाणी मागवलेल्या आहेत. शिवशाही, एशियाड आणि एसटी सध्या चाकरमान्यांसाठी धावत आहेत.एसटीपेक्षा शिवशाही आणि एशियाड बसला आरामदायक आसनव्यवस्था असल्याने 30 ते 40 रुपये अतिरिक्त बसभाडे आकारले जाते. एसटीने बोरिवलीला जाण्यासाठी 60 रुपये तिकीट आकारले जाते. तर तेच एकावेळाचे एशियाड, शिवशाही बसचे भाडे 90 ते 100 रुपये आहे. कामाच्या वेळेतच या महागड्या बस सोडल्या जातात. त्यामुळे त्याचा आर्थिक फटकाही प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य....
अधिक वाचा