By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 05, 2020 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आम्ही केलेली चौकशी प्रोफेशनल होती. एम्सनेही सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल सीबीआयला दिला आहे. त्यामुळे आम्हाला त्यात काही आश्चर्य वाटलं नाही, असं सांगतानाच एम्सच्या अहवालामुळे अखेर सत्य बाहेर आलंच, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी व्यक्त केली. (Parambir Singh on Sushant Singh Rajput Case)
पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची चौकशी प्रोफेशनल होती. त्यामुळे एम्सचा अहवाल आल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटलं नाही. मुंबई पोलिसांविरोधात एक मोहीम चालवली गेली. मात्र, एम्सच्या अहवालामुळे सत्य समोर आलं, असं परमबीर सिंग यांनी सांगितलं.
‘त्या’ फेक अकाऊंटची चौकशी सुरू
सोशल मीडियावर एक फेक अकाऊंट बनवून पोलिसांविरोधातील बदनामीची मोहीम चालवली गेली. त्याची चौकशी सुरू असल्याचं सांगतानाच काही मीडियानेही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम सुरू केली होती, असा आरोपही त्यांनी केला. १६ जून रोजी सुशांतच्या कुटुंबीयांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी सुशांतने आत्महत्या केल्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण सुशांतच्या कुटुंबातील कुणीही चौकशीसाठी आलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एम्सचा अहवाल आल्यानंतर शिवसेनेची टीका
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी एम्सचा अहवाल आला होता. त्यात त्यांनी सुशांतने आत्महत्याच केल्याचं नमूद केलं होतं. त्यावरून शिवसेनेने विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेत्री कंगना रानौत आणि भाजपवर थेट नाव न घेता टीका केली. सुशांतप्रकरणाचा तपास पोलीस चांगला करत होते. त्याच्या आत्महत्येचं कारणही पोलिसांना माहीत होतं. शवविच्छेदन अहवालात सर्व नमूद होतं. पण मृत्यूनंतर कुणाचं चारित्र्यहनन नको म्हणून पोलीस काही बोलत नव्हते. आम्हीही मृत्यूनंतर कुणाची बदनामी नको म्हणून बोललो नाही. मात्र, सीबीआयकडे तपास गेल्यानंतर ड्रग्स आणि चरस सर्व काही बाहेर आलं. आता तर एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला आहे. एम्सचे डॉक्टर हे काही शिवसैनिक नाहीत, असं सांगतानाच सुशांतप्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भरपूर प्रयत्न झाला. त्यांचं हे षडयंत्र उधळलं गेलं. आमच्यासाठी खड्डा खोदणारे स्वत: खड्ड्यात पडले, असा टोला राऊत यांनी लगावला होता.
एका नटीचं बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी काही लोकांनी छाती बडवली. तिच्यासाठी आकांडतांडव केलं. हाथरस आणि बलरामपूर घटनेवर हे लोक का बोलत नाहीत. त्या नटीनंही या घटनेवर बोललं पाहिजे. या घटनेबद्दल तिचं मत काय आहे हे देशाला कळू देत. त्यांना हाथरसचा रस्ता माहीत नसेल तर आम्ही सांगू. हाथरसला कसं जायचं आणि कुठे थांबायचं? याची सविस्तर छापिल माहिती आणि हाथरसला जाण्याचं तिकिट या लोकांना देण्यास आमच्या लोकांना सांगणार आहे, असं ते म्हणाले होते.
घाटकोपरमधील असल्फा इथून एक महिला गटारातून वाहून गेल्याची घटना समोर आली होत....
अधिक वाचा