By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2020 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जमावबंदी आदेश लागू करूनही त्याचा उपयोग होत नसल्यानं राज्य सरकारनं मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली असली तरी मुंबईसह राज्याच्या अन्य शहरांतही लोकांनी संचारबंदी झुगारल्याचं चित्रं मंगळवारी सकाळी दिसलं. विशेषतः भाजी मार्केटमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तर रस्त्यावर वाहनं घेऊन आलेल्या नागरिकांवर पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला.
मुंबईकरांना गांभीर्यच नाही?
मुंबईत सकाळपासून लोक रस्त्यावर दिसत होते. रस्त्यावर वाहनंही बऱ्यापैकी होती. त्यामुळे पोलिसांना रस्त्यांवरून फिरणाऱ्या लोकांवर सौम्य लाठीमार करून त्यांना परत पाठवावे लागले. तर पोलिसांनी गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तपासणी करून कारवाईदेखिल सुरु केली.
मुंबईत भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडले. भाजी मार्केटमध्ये लोकांनी गर्दी केल्यानं संचारबंदीचा आदेश तर धाब्यावर बसवलाच, पण सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनेचेही तीन-तेरा वाजले. भाजी मार्केटमधील ही गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना आता नवे उपाय योजावे लागतील. अन्यथा संचारबंदीचा उपयोग होणार नसल्याचं चित्र मंगळवारी दिसलं.
पुण्यात मार्केटयार्डमध्ये गर्दी
पुण्यातल्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नेहमीपेक्षा कमी असली तरी घाऊक बाजारपेठ असलेल्या मार्केटयार्डमध्ये नागरिकांनी किरकोळ भाजीखरेदीसाठी सकाळी मोठी गर्दी केली होती. भाजी खरेदीसाठी लोकांनी रांगा लावल्यानं गर्दी रोखणं कठीण होऊन बसलं. अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करून लोकांना पांगवावे लागले.
नागपुरात लोकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार
उपराजधानी नागपुरात संचारबंदी असतानाही काहीजण रस्त्यावरून फिरताना दिसले. पोलिसांनी हटकल्यास काहीही कारणं पुढे केली जात असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे असं विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला.
नाशिकमध्ये भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी
नाशिकमध्येही मंगळवारी सकाळी भाजी खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली. कोरोनाचा धोका वाढला असताना कठोर उपाययोजना करूनही लोकांना त्याचं गांभीर्य नसल्याचं चित्रं नाशिकमध्येही दिसलं.
कोकणात बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर होम क्वारंटाईनचे शिक्के
संचारबंदी लागू होण्याआधी सोमवारी मुंबई आणि अन्य भागातून लोक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झाले. त्यामुळे पोलिसांनी कशेडी घाटात गाड्या थांबवून या लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले. कशेडी घाटात सोमवारी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी संचारबंदीमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य रस्त्यांवरची वाहनांची वर्दळही कमी झाली आहे.
रत्नागिरीत सोमवारी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं अनेक वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात १६२४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामधून तब्बल ६ लाख २९ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.
कोल्हापुरात पोलीस सतर्क
कोल्हापुरात संचारबंदी लागू केल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा कोल्हापुरातील पोलिसांचा प्रयत्न आहे. मात्र पोलिसांकडे मास्क नसल्याचं चित्र कोल्हापुरात दिसलं.
औरंगाबादमध्ये कारखाने, पर्यटन बंद, तुरळक गर्दी
राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर औरंगाबादमधील एमआयडीसीमध्ये शुकशुकाट आहे. सुमारे २००० उद्योगातील अडीच लाख कामगार घरीच आहेत. पर्यटन बंद झाल्यानं हॉटेल्सही रिकामी झालीत. असं असलं तरी सकाळी रस्त्यावर थोडी गर्दी पाहायला मिळाली. काही वेळानं तीही हळूहळू ओसरली आहे.
अन्य शहरांतही गर्दी
कल्याण, वर्धा अशा अनेक शहरांत लोकांनी भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्रं मंगळवारी सकाळी दिसलं. त्यामुळे पुढे ही गर्दी कशी रोखायची आणि सोशल डिस्टन्सिंग कसं ठेवायचं याचा विचार पोलिस आणि प्रशासनाला करावा लागणार आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू कर....
अधिक वाचा