By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 12:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
30 सप्टेंबरपर्यंत एकही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशी एक बातमी व्हॉट्सअॅपवर प्रचंड वायरल झाली होती. या बातमीमुळे मुंबईसह देशभरातील प्रवाशांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करुन ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात अजूनही निर्णय झाला नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.पूर्व रेल्वेचे ( Eastern Railway ) एक पत्र सोमवारी (10 ऑगस्ट) व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे, भारतीय रेल्वे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्या पत्राच्या आधारे काही वृत्तपत्रांनी देखील त्यांच्या वेबसाईटवर 30 सप्टेंबरपर्यंत लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणारे प्रवासी संतप्त झाले. कारण लोकल आणखी 50 दिवस धावणार नसल्याने, रस्ते मार्गाचा वापर करुन ऑफिसला जाणे त्यांना परवडणारे नव्हते. या बातम्या व्हॉट्सअॅपवर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड वायरल झाल्या. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रचंड डोकेदुखी झाली.अखेर सोमवारी संध्याकाळी रेल्वे मंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप केला. रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक ट्वीट करण्यात आले. यात, या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगण्यात आले. "काही वर्तमानपत्रांनी चुकीच्या बातम्या देऊन रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत धावणार नाहीत असे सांगितले आहे, मात्र ते चुकीचे असून असे कोणतेही परिपत्रक आम्ही जारी केलेले नाही", असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. यासोबतच पुढील सूचना मिळेपर्यंत सध्या सुरु असलेल्या स्पेशल एक्स्प्रेस गाड्या सुरु राहतील, असे सांगितले. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
मुंबईसह महाराष्ट्रात मध्य आणि पश्चिम रेल्वेचे सर्वाधिक जाळे आहे. त्यामुळे आम्ही मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना या संदर्भात विचारले असता, त्यांनी 11 मे रोजी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक दाखवून, पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येईल असे सांगितले. तसेच 30 सप्टेंबर अशी कोणती तारीख निश्चित नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेकडून देखील हेच उत्तर आम्हाला मिळाले.
Some section of media is reporting that Railways has cancelled all regular trains till 30th September. This is not correct. No new circular has been issued by Ministry of Railways.
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 10, 2020
Special Mail Express trains shall continue to run.
22 मार्चपासून देशातील रेल्वे सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशामध्ये 200 विशेष एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या. तसेच 30 राजधानी विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतलेला नाही. त्यामुळे रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे, अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांचे आणि वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबई लोकलही केवळ सरकारी कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमधील संताप हळूहळू वाढत आहे. लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या सेवा लवकर सुरु कराव्यात या संदर्भात रेल्वे मंत्रालयावर देखील दबाव वाढत चालला आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाला यावर आता लवकरच निर्णय घेणे भाग पडणार आहे.
अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात बुलेटस....
अधिक वाचा