By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 12:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले बिनविरोध निवडून आले. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता अशी पटोलेंची ओळख आहे.
महाविकासआघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले तर भाजपकडून किसन कथोरे यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते.
‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशा महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यादृष्टीने सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला कालपासून विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस आणि मी (चंद्रकांत पाटील) यांनी चर्चा केली. विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावं, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे, ती कायम राहावी, यासाठी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
कोण आहेत नाना पटोले?
नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. यापूर्वी नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी भूषवली.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल चढवला होता. 2017 मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले.
नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या हायव्होल्टेज लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. पटोले आक्रमक असले तरी ही आक्रमकता योग्य ठिकाणी वापरु, अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारीच्या घोषणेनंतर दिली होती.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली होती.
दिलीप वळसे पाटलांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्यामुळे बहुमताच्या चाचणीवेळी वळसेंची वर्णी लागली होती.
फक्त आर्थिक धोरणात बदल करून देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही, असं म्हणते ....
अधिक वाचा