By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2020 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. मुंबईतील एका 49 वर्षीय कोरोनाबाधित महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले होते. कोरोनामुक्त रुग्णाला हा आजार होणं हे दुर्मिळात दुर्मिळ आहे. परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील डीबीएस प्रोग्रामचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर यशस्वी उपचार केले आहेत. या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने 26 ऑक्टोबर रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
49 वर्षीय माधवी धारिया ही महिला रायगड जिल्ह्यातील महाड शहरात राहणारी आहे. या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. या आजाराची सौम्य लक्षणं असल्याने या महिलेवर आणि तिच्या पतीवर घरीच उपचार करण्यात आले. परंतु तीन आठवड्यानंतर तिला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. ऑर्थोपेडिक सर्जनद्वारे औषधोपचार सुरु होते. पण काही दिवसांनी चेहऱ्यांच्या एका बाजूला पक्षाघात झाला होता. या महिलेला चालता येत नव्हतं. प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी तिला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल केलं.
परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील डीबीएस प्रोग्रामचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, "या महिलेला चालता येत नसल्याने व्हीलचेअरवर रुग्णालयात आणले होते. चेहऱ्यावर अशक्तपणा जाणवत होता, हातांनी काहीही पकडता येत नव्हतं, बोलताना शब्दही स्पष्ट उच्चारता येत नव्हते. अशा स्थितीत या महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा विकार असल्याचं निष्पन्न झालं.
"गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मिळ विकार आहे. मुळात, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास संसर्गजन्य आजाराची पटकन लागण होते. परंतु, हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करुन या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशावेळी रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. जीबीएस हा आजार श्वसन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकते," असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले, "वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण यातून बरा होऊ शकतो. यावर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी इंजेक्शनचा कोर्स पाच दिवस दिला जातो. या उपचारानंतर 10 दिवसांनी रुग्ण घरी जाऊ शकतो."
"गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुस यांच्यासारख्या अवयवांवर परिणाम करतो. कोरोनाच्या काळात जीबीएस प्रकरणांची संख्या वाढत आहे. ग्लोबल रुग्णालयात मागील चार महिन्यात अशी तीन प्रकरणं समोर आलेली आहेत. तर मुंबईतील न्यूरोलॉजिस्टने आतापर्यंत किमान 25 प्रकरणे पाहिली आहेत", असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.
मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले की, "सार्स आणि कोविड-19 हा विषाणू फुफ्फुसावर परिणाम करतो. परंतु, या विषाणूमुळे मानवी शरीरातील अवयवांसह मेंदूवर घातक करतोय. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचं आहे. सध्या आम्ही मेंदूविकाराशी आणि हृदयासंबंधी तक्रार करत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहत आहोत. त्यामुळे कुठल्याही त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या."
रुग्ण माधवी धारिया म्हणाल्या की, "कोरोनामुळे मला पक्षाघात झाला होता. डॉ. अग्रवाल यांनी वैद्यकीय चाचणीत गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले. मला चालतानाही येत नव्हतं. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला नव्याने आयुष्य मिळाले आहे. मी सर्वांना विनंती करते की आपली कोविड स्थिती लपवू नये आणि त्यासाठी योग्य ते उपचार घ्यावेत."
पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी भाजपचे आमद....
अधिक वाचा