By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 30, 2020 05:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संचारबंदीच्या काळात घाबरलेले हजारो स्थलांतरित घरे गाठण्यासाठी जीवाची बाजी लावत असल्याचे पुढे येत आहे. असुरक्षिततेच्या शिखरावर असताना एकाकीपणा, हतबलता आणि अस्वस्थता या भावना उचंबळून आल्याने अविवेकी निर्णय घेतले जातात. आपण संकटांमध्ये अधिकच भर टाकतो याकडे मानसोपचारतज्ज्ञ डॉ उमेश नागापूरकर यांनी लक्ष वेधले. कुटुंबांपासून दूर असलेल्यांनी घाबरून जाऊ नये, कुटुंबीयांनी त्यांना घाबरवून सोडू नये उलट आहेत तिथेच राहावे.
घाबरू नका, घाबरवू नका
घरापासून दूर असणाऱ्यांच्या मनात एकाकीभाव निर्माण होणे सहाजिक आहे. धीराने विचार केला तर त्यातून मार्ग काढणे सोपे आहे. प्रत्येकाच्या हातातील फोन हा त्यावरील उपाय आहे. दूर असलेल्यांनी प्रवास करून घरी पोहोचण्यापेक्षा आहात तेथूनच घरच्यांच्या संपर्कात राहा. घरच्या मंडळींनीही त्यांना लगेच निघून ये, असशील तसा ये अशा अधीरतेच्या सल्ल्यांनी त्यांची असुरक्षितता वाढवण्यापेक्षा त्यांना फोनवरून धीर देेणे, एकटे वाटू नये यासाठी त्यांच्याशी संवाद साधत राहाणे गरजेचे आहे.
विश्लेषण करावे
नेमके कशामुळे आपल्याला असुरक्षित वाटते आहे याची यादी तयार करा. उदा - आजच्या खाण्याची चिंता आहे, उद्याचा किराणा संपेल याची काळजी आहे, नोकरी धंद्याचे टेन्शन आहे. यादी झाल्यावर त्यातील कोणत्या प्रश्नांचे आपल्या हातात असलेले उपाय लिहून काढा व त्या दृष्टीने विचार करा. भावनिक अगतिकतेच्या काळात अनेक प्रश्नांची साधीसोपी उत्तरे आपल्याला दिसत नाहीत. अशाप्रकारे भावना आणि विचार वेगळे काढले तर आपल्या हातातील उत्तरे आपल्याला सापडतात.
अधीर नका,आशादायी व्हा
आपत्तीच्या काळात मानसिक कमकुवतपणा उचंबळून येतो. त्यामुळे अधीर न होता स्वत:लाच धीर देणे, हा टप्पा संपेल हा आशावाद मनात प्रबळ करणे हा महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. त्यासाठी स्व-संवाद बदलावा. आपण कुठे अडकलो, आता कसं होणार, काय खाणार, कसं राहाणार हे प्रश्न स्वत:शी सतत घोकत राहिलो तर काहीच सुचत नाही, उलट अधिकाधिक हतबल वाटत राहाते. आपण अडकलोय या मानसिकतेपेक्षा त्यापेक्षा यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करा.
मदत मागा, मदत मिळवा
सुरुवातीच्या काळापेक्षा आता परिस्थिती थोडी नियंत्रणात आली आहे. मदतीसाठी लोक पुढे येत आहेत. आपणही आहोत तेथील स्थानिकांशी संपर्क साधणे, आपली अडचण सांगणे आणि मदत मागणे गरजेचे आहे. निश्चितच मदतीचे हात पुढे येतात. फोन हा सध्याच्या काळातील सर्वात मोठा आधार आहे. जवळच्यांशी संपर्क वाढवा. आपल्याकडील संसाधनांचे शांतपणे नियोजन करा. घरी पोहोचल्यावरच आपण सुरक्षित असू या आगतिकतेतून जीव धोक्यात घालून प्रवास टाळा.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना संबंधीत एक अति म....
अधिक वाचा